सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे तिस्ता नदीला आलेल्या पुरात सैन्याचे 23 जवान बेपत्ता झालेत. तसेच सैन्याची काही वाहने देखील पुराच्या पाण्यात बुडाली. या घटनेनेतर भारतीय सैन्याने मोठी शोध मोहीम सुरू केल्याची माहिती गुवाहाटीतील सैन्याच्या प्रसिद्धी प्रमुखाने दिली.
गंगटोक येथील भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, एका भागात एका तासात 100 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडतो, तेव्हा त्याला ढगफूटी म्हणतात. अधिका-यांनी सांगितले की उत्तर सिक्कीममध्ये देखील मंगळवारी अशीच ढगफुटी झाली. यामुळे पर्वतांच्या वरच्या भागात हिमनदी तलाव फुटल्याने नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढली.तिस्ता नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढल्याने उत्तर सिक्कीममध्ये मंगळवारी रात्री उशिरा किमान 6 पूल वाहून गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तिस्ता नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढल्याचे वृत्त मिळताच सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदीकाठच्या सखल भागांना रिकामे करण्यास सुरुवात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, झारखंडवरील कमी दाबाचा पट्टा आणि चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्येही जोरदार पाऊस झाला. पूर्वेकडील राज्यात गुरुवारपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने दिली आहे. यासोबतच पश्चिम बंगालमध्ये देखील मुसळधार पावसामुळे बीरभूम, बांकुरा, पश्चिम बर्दवान, पूर्व बर्दवान, पश्चिम मिदनापूर, हुगळी आणि हावडा यासह किमान 7 जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.