पुण्याच्या पाणी प्रश्नावर आज पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची महत्वाची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीला माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दांडी मारली आहे. त्यामुळे या बैठकीच्या निमित्ताने अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या सुप्त संघर्षाचा नवा अंक आज पाहायला मिळाला. या बैठकीला चंद्रकांत पाटील यांच्या सोबतच भाजपच्या बहुतांश आमदारानी दांडी मारली. पुण्यातील महत्वाच्या प्रश्नाची बैठक असताना चंद्रकांतदादा पाटील यांनी मारलेल्या दांडीवर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी जोरदार टीका केली आहे.
आज चंद्रकांत पाटील हे अमरावतीच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तिथे नियोजित दौरा असल्याने चंद्रकांत पाटील आजच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नसल्याचं त्यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, यावर धंगेकर यांनी निशाणा साधत अमरावती नाही तर सोलापूर मार्गे कोल्हापूरला आता चंद्रकांत पाटलांना जावं लागणार असून त्यांचा राजकीय प्रवास त्यामार्गे सुरु झाला असल्याचा चिमटा काढला आहे.
चंद्रकांत पाटील आता महाराष्ट्राचं काम बघतात. आता ते हळूहळू कोल्हापूरला जाणार आहेत. सोलापुराहून कोल्हापूर जवळ आहे. त्यांच्या राजकीय जीवनाचा प्रवास आता सुरु झालाय. पुण्याला आता एक पालकमंत्री आहे, त्यामुळे तथाकथित पालकमंत्र्याचा काही उपयोग नाही. तर सहपालकमंत्री ही चंद्रकांत पाटलांच्या डोक्यातून आलेली सुपीक कल्पना असल्याचं धंगेकर म्हणाले आहेत.
दरम्यान, सोलापूरचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील आणि भाजपचा एकही आमदार या बैठकीला उपस्थित नव्हता. भीमराव तापकीर यांनी हजेरी लावली पण ते सगळी बैठक संपल्यावर आले. त्यामुळे या सगळ्या आमदारांच्या वतीने मलाच बोलाव लागलं असं देखील धंगेकर म्हणाले आहेत. ‘पुण्याचा पाणीसाठा कमी झाला नाही पाहिजे, पुण्याला पुरेसं पाणी मिळायला हवे. पुण्याची वाढती लोकसंख्या पाहता पुण्याला जास्तीत जास्त पाणी ठेवावं अशी विनंती मी पालकमंत्र्यांकडे केली. असं रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.