शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शाळेतील दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी पीडितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
यातील फिर्यादीची मुलगी शहरातील एका मध्यवर्ती शाळेमध्ये शिकत आहे. नेहमीप्रमाणे वडिलांनी तिला शाळेमध्ये सोडले होते. त्यानंतर दुपारी फिर्यादीच्या पत्नीच्या मोबाईलवर शाळेतून फोन आला. त्यांनी ”तुमची मुलगी घरी आली आहे का?” अशी विचारणा केली.फिर्यादीच्या पत्नीने शाळेत जाऊन चौकशी केली असता त्यांची मुलगी शाळेत दिसून आली नाही. तिचे दप्तर तपासले असता वहीवर तिने तिचे नाव लिहिलेले दिसून आले. येथून बाहेर पडून त्यांनी मुलीचा शोध घेतला व शाळा सुटेपर्यंत मुलीच्या येण्याची वाट पाहिली. मात्र, ती आली नाही. यामुळे त्यांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. तेथे गेल्यानंतर पीडितेच्या शाळेतील आणखी एक मुलगी अशाच पद्धतीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली. तिचे पालकही पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले होते.