सोलापूर शहरातील पार्क स्टेडियमच्या प्रवेशद्वारासमोर एका तरुणाला काठीनं डोक्यात प्रहार करुन खुनी हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. जखमीचे नाव राजू असल्याचे सांगण्यात येत आहे. येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. शुक्रवारी सकाळच्यावेळी जखमीच्या डोक्यात प्रहार केल्यानं रक्तबंबाळ अवस्थेत अनोळखी तरुण पार्क स्डेडियमच्या प्रवेशद्वारासमोर पडला असल्याची खबर फौजदार चावडी पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असता संबंधीत अनोळखी तरुणाचे डोके फुटल्याने रक्तस्त्राव झाल्याचे तसेच शेजारी काठी पडल्याचे दिसून आले.
तातडीने त्याला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु होते मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळासह परिसराचे फूटेज तपासले असून, आरोपीचा शोध सुरु आहेत. संशयास्पद हालचाली फुटेजच्या माध्यमातून कैद झाल्या असून, लवकरच आरोपी हाती लागतील, असे सांगण्यात आले. संबंधीत जखमीचे नाव राजू असल्याचे सांगण्यात येत आहे.