चारचाकी वाहनातून एमडी ड्रग्ज विकायला सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी पाटीजवळ आलेल्या दोघांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडील तीन किलो ड्रग्ज अंदाजे सहा कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत (ता. २३) पोलिस कोठडी ठोठावली आहे. मुंबई पोलिसांच्या कारवाईनंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोली एम.आय.डी.सी.तील एक बंद कंपनी भाड्याने घेऊन गवळी बंधू घातक एमडी ड्रग्ज तयार करीत होते. मुंबई क्राईम ब्रॅंचने दया नायक यांच्या नेतृत्वाखाली त्या दोघांना मुंबईतच पकडले. त्या दोघांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तो कारखाना सिल करून तेथील मुद्देमालही जप्त केला.
या कारवाईत एकूण ११६ कोटींचा मुद्देमाल मुंबई क्राईम ब्रॅंचने हस्तगत केला होता. त्याचा तपास सुरु असतानाच आता मंगळवारी पहाटेच्या सुमारास सोलापूर ग्रामीण पोलिसांनी देवडी पाटीजवळ (ता. मोहोळ) सहा कोटींच्या तीन किलो एमडी ड्रग्जसह दोघांना जेरबंद केले. दत्तात्रय लक्ष्मण घोडके व गणेश उत्तम घोडके (दोघेही रा. औंढी, ता. मोहोळ) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. चारचाकीसह पोलिसांनी त्यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. चिंचोली एमआयडीसीतील कंपनीत एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या गवळी बंधूंची खबर सोलापूर ग्रामीण पोलिसांना लागली होती. ग्रामीण पोलिसांनी त्यांची माहिती घेतली होती आणि एक-दोन दिवसांत कारवाई होणार, तेवढ्यात त्यांना मुंबई क्राईम ब्रॅंचने पकडले.
त्यामुळे सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या हातून ही कारवाई होवू शकली नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘ माहीती दिली..खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर अधीक्षक हिंमत जाधव, उपअधीक्षक अमोल भारती, मोहोळचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या पथकाने देवडी पाटीजवळ दोघांना तीन किलो एमडी ड्रग्जसह पकडले.