सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक आता थेट जून २०२४ मध्येच होईल, अशी चर्चा आहे. ‘वन बार व वोट’अंतर्गत आता प्रत्येक वकिलाला तालुका किंवा जिल्हा स्तरावरील बार असोसिएशनसाठीच मतदान करता येणार आहे. तत्पूर्वी, दोन्हीकडे नावे असलेल्यांना पर्याय दिला जाणार आहे.
सोलापूर न्यायालयात प्रक्टिस करणारेच वकिल सोलापूर बारचे सदस्य असणार आहेत. सोलापूर बार असोसिएशनची मागील निवडणूक नोव्हेंबर २०२२ मध्ये पार पडली होती. त्यात ॲड. सुरेश गायकवाड यांनी बाजी मारली आणि अध्यक्षपदी ते विराजमान झाले. त्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ आता संपणार असल्याने बार असोसिएशनची निवडणूक पुढच्या महिन्यात होईल म्हणून अनेकजण आतापासूनच तयारी करीत आहेत. परंतु, बारच्या घटनेनुसार दरवर्षी जून महिन्यात निवडणूक होते. त्यामुळे सध्याचे पदाधिकारी जूनपर्यंत राहतील, असेही सांगितले जात आहे.