भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासह आत्मनिर्भर भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी, कोळसा मंत्रालय, कोळसा आयातीवरील अवलंबित्व कमी करून राष्ट्रीय कोळसा वाहतूक योजना विकसित करत आहे, त्यामध्ये कोळसा खाणींच्या जवळ रेल्वे साइडिंगद्वारे फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी (एफएमसी) चा समावेश आहे. कोळसा मंत्रालयाने फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी प्रकल्पा अंतर्गत, कोळशाची वाहतूक आणि लोडिंग करणाऱ्या यांत्रिक प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी एक योजना तयार केली आहे.
फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी प्रकल्पा अंतर्गत, खाणींमधील कोळशाची जवळच्या रेल्वे साईडिंगपर्यंत रस्ते किंवा इतर मार्गाने वाहतूक करावी लागणार नाही. फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी प्रकल्पानुसार कन्व्हेयर बेल्ट किंवा रस्त्यावरून जवळच्या रेल्वे साईडिंगपर्यंत कोळशाची वाहतूक केल्यामुळे कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या संख्येत घट होईल तसेच वायू प्रदूषण, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरावस्था अशा पर्यावरणाशी निगडित घटकांवर देखील त्याचा सकारात्मक परिणाम होऊन स्वच्छ आणि आरोग्यदायी पर्यावरणाला चालना मिळेल.
खाणीतून कोळसा काढणे आणि वितरण क्षमता यांचा आढावा घेण्यासाठी कोळसा मंत्रालय रेल्वे मंत्रालयाबरोबर समन्वय साधत आहे. सध्या, कोळसा वितरण क्षमता वृद्धीसाठी रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने 13 रेल्वे मार्ग बांधले जात असून ते बांधकामाच्या विविध टप्प्यांवर आहेत.
कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी : वाहतूक व्यवस्थेचा पुरेपूर वापर करणे आणि जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या वाहनांवरील अवलंबित्व कमी केल्याने हरितगृह वायू उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी होण्यात, हवामान बदलाचा सामना करण्यात आणि त्याचे हानिकारक प्रभाव कमी करण्यात मदत होईल.
नैसर्गिक पर्यावरणाचे संवर्धन : पर्यावरण पूरक वाहतूक व्यवस्थेमुळे नैसर्गिक अधिवासाचे तसेच जैवविविधतेचे संरक्षण होते तसेच भावी पिढीसाठी अत्यंत तरल अशा जैवसंस्थेचे जतन होते.
सार्वजनिक आरोग्य सुधारणे : वायू प्रदूषण आणि रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी झाल्याने सार्वजनिक आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो त्यामुळे श्वसनाशी संबंधित आजार आणि ताण तणावाशी संबंधित विकारांचे प्रमाण कमी होते.