स्विस बँकेकडून भारतीय खातेदारांच्या माहितीचा नवा संच केंद्र सरकारला हस्तांतरित करण्यात आलाय. स्वित्झर्लंड आणि भारत यांच्यातील माहितीची ही पाचवी वार्षिक देवाणघेवाण आहे. स्वित्झर्लंडने सुमारे 36 लाख आर्थिक खात्यांचे तपशील 104 देशांसोबत शेअर केले आहेत.
यासंदर्भातील माहितीनुसार स्विस बँकेकडून भारताला शेअर केलेले नवीन तपशील शेकडो आर्थिक खात्यांशी संबंधित आहेत, ज्यात काही व्यक्ती, कॉर्पोरेट्स आणि ट्रस्ट यांचा समावेश आहे.स्विस बॅंकेने केंद्र सरकारला दिलेल्या या तपशीलांमध्ये नाव, पत्ता, राहण्याचे ठिकाण आणि कर ओळख क्रमांक यासह खाते क्रमांक आणि आर्थिक माहितीचा समावेश आहे. यासोबतच आर्थिक अहवाल, खात्यातील शिल्लक आणि भांडवली उत्पन्नाशी संबंधित माहितीही देण्यात आली आहे.
स्विस बँकेने ही माहिती गेल्या महिन्यात सोपवली असून पुढील माहितीचा संच स्वित्झर्लंड सप्टेंबर 2024 मध्ये उपलब्ध करून देईल. या माहितीवरुन करदात्यांनी त्यांच्या टॅक्स रिटर्नमध्ये योग्य माहिती दिली आहे की नाही हे तपासण्यास मदत होणार आहे. गेल्या 5 वर्षांपासून स्विस बँकेकडून मिळालेल्या माहितीमुळे करचुकवेगिरीच्या तपासात भारतीय यंत्रणांना मोठी मदत मिळत आहे. त्यांना मोठ्या संख्येने भारतीय कंपन्या आणि स्विस बँकेत खाती असलेल्या लोकांची माहिती मिळत आहे. स्विस खात्यात किती रक्कम कोणी जमा केली आणि त्या खात्यातून किती रक्कम कुठे हस्तांतरित झाली याचीही माहिती भारताला मिळत आहे. यामुळे देशविरोधी कारवायाही टाळण्यात मदत होत आहे.