लक्षद्वीपमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांना लोकसभेत अपात्र ठरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे फैजल यांना अपात्र घोषित करण्याची ही दुसरी वेळ आहे. शरद पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
फैजल आणि अन्य तिघांना पी. सालेह यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली १० वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली होती. दरम्यान केरळ उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर फैजल यांचे लोकसभा सदस्यत्व निलंबित करण्यात आले.
केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लक्षद्वीप लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे लोकसभा सदस्य मोहम्मद फैजल यांना लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यांच्या दोषी ठरविण्याची तारीख, म्हणजे ११ जानेवारी २०२३ असल्याचे लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
न्यायमूर्ती एन. नागरेश म्हटले आहे की, निवडणूक प्रक्रियेचे गुन्हेगारीकरण लोकशाहीसाठी चिंताजनक आहे. दरम्यान उच्च न्यायालयाच्या आधीच्या आदेशानुसार फैजल आणि इतर तिघांच्या शिक्षेवर स्थगिती असणार आहे. ही स्थगिती अंतिम निकाल लागेपर्यंत कायम राहील. ११ जानेवारी २०२३ रोजी कावरत्ती सत्र न्यायालयाने फैजल आणि इतर तिघांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.