एशिअन फिल्म फौंडेशनतर्फे आयोजित केला जाणारा २० व्या थर्ड आय आशियाई महोत्सव यावेळी डिसेंबरमध्ये होत आहे. २००२ साली सुरु झालेल्या या महोत्सवाचे हे २० वे वर्ष आहे. मुंबई आणि ठाणे परिसरातील चित्रपट रसिकांसाठी आशिया खंडातील समकालीन चित्रपट पाहण्याची संधी या महोत्सवाच्या माध्यमातून चित्रपट रसिकांना मिळत असते. अशा प्रकारचा हा एकमेव चित्रपट महोत्सव आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहयोगाने संपन्न होत असलेल्या या महोत्सवाला प्रभात चित्र मंडळाचे विशेष सहकार्य लाभले आहे.
या महोत्सवात जपान, इराण, बांगलादेश, श्रीलंका अशा विविध आशियायी देशांमधील आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. या महोत्सवात यावेळी समकालीन भारतीय प्रादेशिक चित्रपट आणि समकालीन मराठी चित्रपट अशा दोन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ऑगस्ट २०२२ नंतर निर्माण झालेले प्रादेशिक आणि मराठी चित्रपट या स्पर्धांसाठी अर्ज करू शकतात. स्पर्धकांनी महोत्सवाच्या www.thirdeyeasianfilmfestival.com या संकेतस्थळावर जाऊन www.filmfreeway मार्फत प्रवेशिका भरण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या दोन स्पर्धा विभागाबरोबर एशिअन स्पेक्ट्रम , मृणाल सेन यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्या चित्रपटाचे सिंहावलोकन हे विभाग ही या महोत्सवात असणार आहेत.
महोत्सवा दरम्यान परीक्षकांनी निवडलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपट , दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री यांना पुरस्कार देण्यात येणार असून एशिअन कल्चर अवार्ड, सत्यजित राय स्मृती पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट समीक्षकाला स्वर्गीय सुधीर नांदगावकर पुरस्कार देखील देण्यात येणार आहेत.