राज्य सरकारने गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ करून ३४ रुपये दर केला आहे. सहकारी दूध संघांना शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने दुधाला दोन रुपयांचे अर्थसाहाय्य करून सहकारी दूध संघास पाठबळ देण्याची मागणी जिल्हा दूध उत्पादक संघाने (कात्रज डेअरी) केली आहे.
शासन निर्णयानुसार २१ जुलैपासून दूध उत्पादकाला ३४ रूपये प्रतिलिटर दर देण्याचे आदेश झाले आहेत. त्याप्रमाणे कात्रज डेअरीने त्याची अंमलबजावणी केली आहे. या निर्णयामुळे संघाला प्रतिदिन साडेतीन लाखांचा तोटा होत असून तो दुग्धव्यवसाय विकास आयुक्तांना कळविण्यात येत आहे. तरी दूधाचे दर ३४ रुपये प्रति लिटरचे बंधनकारक करु नये, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पशुसवंर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांनी केली आहे.