राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे नागपुरात आयोजित विजयादशमी सोहळ्यात यंदा ख्यातनाम गायक पद्मश्री शंकर महादेवन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेय. आगामी 24 ऑक्टोबर रोजी नागपुरात आयोजित संघाच्या स्थापना दिवस कार्यक्रमात शंकर महादेवन हजेरी लावणार आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वर्षप्रतिपदा (गुडी-पाडवा), शिवराज्याभिषेक दिन, रक्षा बंधन, गुरु पौर्णिमा, विजयादशमी, मकरसंक्रांती असे 6 उत्सव साजरे केले जातात. या उत्सवांच्या आयोजना मागे संघाचे स्वतःचे असे तत्त्वज्ञान आहे. नागपुरात आयोजित होणारा विजयादशमी उत्सव आणि तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाची सांगता या कार्यक्रमांना विशेष महत्त्व आहे. संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी 27 सप्टेंबर 1925 रोजी विजयादशमीच्या दिवशी संघाची स्थापना केली होती. त्यामुळे विजयादशमी उत्सवाच्या दिवशी संघाचा स्थापना दिवस देखील असतो. या दिवशी सरसंघचालक स्वंयसेवकांचे मार्गदर्शन करतात. तसेच या कार्यक्रमाला समाजाच्या विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना संघाच्या व्यासपीठावर अतिथी म्हणून आमंत्रित केले जाते. गेल्या वर्षी 5 ऑक्टोबर 2022 रोजी संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात गिर्यारोहक पद्मश्री संतोष यादव यांना मुख्य अतिथी म्हणून गौरवण्यात आले होते. तर यावर्षी आगामी 24 ऑक्टोबर रोजी नागपुरातील रेशीमबाग मैदानात आयोजित विजयादशमी कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक पद्मश्री शंकर महादेवन यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात आलेय.
‘ब्रेथलेस सिंगर’ म्हणून देशभर ओळखलेजाणारे गायक, संगीतकार शंकर महादेवन हे मुलतः केरळच्या पलक्कड शहरातील तमिळ अय्यर कुटुंबातील आहेत. शंकर महादेवन यांचा जन्म 3 मार्च 1967 रोजी मुंबईच्या चेंबूर उपनगरात झाला. त्यांचे शालेय शिक्षण चेंबूरच्या अवर लेडी ऑफ पर्पेच्युअल सुकर हायस्कूल आणि स्वामी विवेकानंद हायस्कूलमधून झाले. त्यांनी 1988 मध्ये रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नवी मुंबई येथून कॉम्प्युटर सायन्स आणि सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केली.संगीत दिग्दर्शक आणि गायक शंकर महादेवन यांच्याही आयुष्यात असेच काहीसे घडले आहे. अभियांत्रिकीची पदवीप्राप्त शंकर महादेवन यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि आपल्या अंगी असलेल्या संगीत कला, कौशल्याला आपला व्यवसाय बनवला.
शंकर महादेवन यांना आईच्या गर्भातच संगीताची देण मिळाली होती बहुतेक. लहानपणीच ते एक हार्मोनियम वादक बनले होते आणि त्यांनी वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी वीणा वाजवण्यास सुरुवात केली होती. शंकर महादेवन यांनी पंडित श्रीनिवास खळे यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आहे. तसेच, कर्नाटक शास्त्रीय संगीतातील तज्ञ टी.आर. बालामणी यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले आहे. संगीतकार-गायक शंकर महादेवन यांना वयाच्या अकराव्या वर्षी दिग्गज गायिका, भारतरत्न लता मंगेशकर यांच्यासोबत गाणे गाण्याची संधी मिळाली आणि त्यांनी आपल्या संगीत कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांचे पहिले रेकॉर्डिंग वयाच्या अकराव्या वर्षी ”राम श्याम गुण गान” नावाच्या अल्बमसाठी झाले होते. लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी तेव्हा पहिल्यांदाच एकत्र आले आणि त्यांनी शंकर महादेवन यांना अल्बममध्ये काम करण्याची संधी दिली.
शंकर महादेवन यांचे नाव नेहमी शंकर-एहसान-लॉय असेच घेतले जाते. शंकर-एहसान-लॉय या त्रिकुटाची हिंदी संगीत उद्योगात ‘अमर अकबर अँथनी’ अशी ख्याती आहे. शंकर महादेवन हे मराठी, मल्याळम, तामिळ, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी अशा सर्वच भाषा अस्खलित बोलतात. त्यांनी सर्वच भाषेत एकापेक्षा एक गाणी गायली आणि ती हिटसुद्धा झाली आहेत. शंकर महादेवन हे अलीकडच्या काळातील सर्वात यशस्वी गायक आणि संगीतकारांपैकी एक आहेत.शंकर महादेवन यांना 2019 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यासोबतच 28 सप्टेंबर 2011 रोजी लता मंगेशकर पुरस्कार, “कल हो ना हो” चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन आणि 2007 मध्ये “तारे जमीन पर” चित्रपटातील “मा” गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कारही त्यांनी पटकावला आहे.