पश्चिम बंगालमध्ये उत्तर 24 परगनाच्या दत्तपुकुर येथे एका फटाक्यांच्या कारखान्यात रविवारी सकाळी सकाळी 10 वाजताच्या सुमारास मोठा स्फोट झाला. या भीषण स्फोटात आठ जण ठार, पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. यात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या स्फोटात आजूबाजूच्या अनेक घरांचेही नुकसान झाले आहे.
पश्चिम बंगाल स्टेट युनिव्हर्सिटीपासून अवघ्या तीन किमी, तर कोलकातापासून ३० किमी अंतरावर नीलगंजमधील मोशपोल येथे ही दुर्घटना घडली. अपघाताच्या वेळी कारखान्यात अनेक लोक काम करत होते. अधिक माहितीनुसार, इमारतीचे छत पूर्णपणे उडून गेले आणि मृतांचे छिन्नविछिन्न झालेले मृतदेह रस्त्यावर आले. या संदर्भात पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मे महिन्यातही आठवडाभरात तीन स्फोट
याआधी मे महिन्यातही फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये आठवडाभरात तीन स्फोट झाले होते. यापैकी तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरी बीरभूम जिल्ह्यात झाली. ज्यामध्ये कोणीही मारले गेले नाही. त्याआधी दक्षिण २४ परगणा येथे झालेल्या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला होता. पूर्व मेदिनीपूरमध्येही १६ मे रोजी बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात हा प्रकार घडला होता. यामध्ये १२ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.