सुंदर पिचाई, सत्य नडेला, पराग अग्रवाल यांच्यासह भारतीय वंशाच्या अनेक टेक सीईओंनी आपल्या कौशल्य आणि क्षमतेच्या बळावर जगभर छाप सोडली आहे. त्याच बरोबर देशातही गेल्या १० वर्षांत अनेक तरुण उद्योजकांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला असून अवघ्या एका दशकात या तरुण टेक सीईओंच्या कंपन्यांनी प्रचंड वाढ नोंदवली आहे. भारतातील दशकातील सर्वात यशस्वी तरुण सीईओंमध्ये पेटीएम, ओला, झोमॅटो, बायजू आणि ओयो यासह इतर स्टार्टअप्सचे संस्थापकांचा समावेश होतो. एका मोठ्या कंपनीत काम केल्यानंतर त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला आणि त्याला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले.
कोण आहे भाविश अग्रवाल?
भाविश अग्रवाल ओलाच्या संस्थापकांपैकी एक आहे. २०१० मध्ये त्यांनी त्यांचा मित्र अंकित भाटीसोबत कंपनीची पायाभरणी केली आणि देशात कॅब सेवेचे अनोखे मॉडेल सुरू केले. या आधी या मॉडेलशी कोणीही परिचित नव्हते. टॅक्सीच्या वाईट अनुभवानंतर त्यांनी ही कंपनी स्थापन केली. IIT बॉम्बे पदवीधर भाविशने मायक्रोसॉफ्टची नोकरी सोडून Ola ही कॅब सर्व्हिस कंपनी सुरू केली. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीच्या कॅबमधून लाखो लोक प्रवास करतात त्याने एक गाडीही खरेदी केली नाही.
IIT मुंबईतून शिक्षण
IIT बॉम्बे मधून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी मध्ये पदवीधर (B.Tech) भावीश अग्रवालने २०१०-११ मध्ये ओला कॅब्सची स्थापना केली. पहिल्या प्रयत्नात त्याची आयआयटीमध्ये निवड झाली नाही. आणि प्रवेश परीक्षेत नापास झाल्यानंतर तो तयारीसाठी कोटा येथे गेला. एक वर्षाच्या तयारीनंतर त्याला परीक्षेत २३वा क्रमांक मिळाला.
मायक्रोसॉफ्टमधून करिअरची सुरुवात
भाविशने आपल्या करिअरची सुरुवात मायक्रोसॉफ्टमधून करत येथे कंपनीत दोन वर्षे काम केले. यादरम्यान त्याने दोन पेटंटही दाखल केले. आंतरराष्ट्रीय संशोधन जर्नल्समध्येही त्यांची नियतकालिके प्रकाशित झाली आहेत. एक IIT पासआउट तरुण जेव्हा लाखोंचे पॅकेजची नोकरी सोडून स्वत: काहीतरी करण्याचा विचार करतो, तेव्हा त्यांचे पालक त्याच्या निर्णयावर साहजिक नाखूष होतात. ओला कॅबचे संस्थापक भाविशच्या बाबतीतही असेच घडले. चांगली नोकरी मिळाल्यानंतरही त्याने आपले स्वप्न पूर्ण केले आणि ओला कॅब सुरू केली. भाविशचे आई-वडील डॉक्टर असून वडील ऑर्थोपेडिक सर्जन तर आई पॅथॉलॉजिस्ट आहेत.
वाईट अनुभवानंतर कल्पना सुचली
एका वाईट अनुभवानंतर भाविशने (ओला) कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. मित्रांसोबत वीकेंडला जाण्यासाठी त्याने बंगळुरूहून बांदीपूरला टॅक्सी घेतली. यादरम्यान त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. टॅक्सी चालक म्हैसूरला थांबला. मग तो सुरुवातीला जेवढे पैसे घ्यायला तयार होता त्यापेक्षा जास्त पैसे मागू लागला. त्याच्या वाईट वागणुकीमुळे भाविश आणि त्याच्या मित्रांना बसने प्रवास करावा लागला. तेव्हाच त्याने परवडणाऱ्या किमती आणि उत्तम ग्राहक अनुभव असलेली टॅक्सी सेवा सुरू करण्याचा विचार केला.