मुंबई: ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे मंगळवारी पहाटे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे मुंबईतील शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे. ६३ वर्षांच्या विश्वनाथ महाडेश्वर यांनी कोणाच्याही ध्यानीमनी नसताना जगाचा निरोप घेतला. विश्वनाथ महाडेश्वर आणि त्यांच्या पत्नी पूजा महाडेश्वर यांच्या लग्नाचा मंगळवारी वाढदिवस होता. त्यासाठी विश्वनाथ महाडेश्वर यांची मुलगी आणि काही आप्तेष्ट काल रात्रीच लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या सांताक्रुझ येथील घरी गेले होते.
वेळीच विश्वनाथ महाडेश्वर यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांची प्रकृती बिघडल्याचे पाहून महाडेश्वर यांना तातडीने व्ही.एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात नेल्यानंतर सुरुवातीला त्यांची प्रकृती स्थिर होती. विश्वनाथ महाडेश्वर यांची प्रकृती बिघडल्याचे समजताच स्थानिक शाखाप्रमुख आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब रुग्णालयात गेले होते. काहीवेळानंतर विश्वनाथ महाडेश्वर यांची प्रकृती खालावण्यास सुरुवात झाली. त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले होते. परंतु, विश्वनाथ महाडेश्वर कोणत्याच उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. अखेर पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती शाखाप्रमुख संदीप शिवलकर यांनी दिली. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या आकस्मिक निधनामुळे शिवसेनेत (ठाकरे गट) शोककळा पसरली आहे.
आज दुपारी दोन वाजल्यापासून विश्वनाथ महाडेश्वर यांचे पार्थिव सांताक्रूझ येथील राजे संभाजी विद्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाडेश्वर यांच्या अंत्यदर्शनासाठी जाणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता विश्वनाथ महाडेश्वर यांची अंत्ययात्रा निघेल.
विश्वनाथ महाडेश्वर यांच्या निधनामुळे मुंबईतील एक कडवा शिवसैनिक हरपला आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपली असताना विश्वनाथ महाडेश्वर यांच्या जाण्याने ठाकरे गटाला धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून विश्वनाथ महाडेश्वर यांची प्रकृती व्यवस्थित नव्हती. नुकतेच ते कणकवली येथील आपल्या गावाहून मुंबईला परतले होते. आज लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे महाडेश्वर यांच्या घरी कालपासूनच सेलिब्रेशन सुरु झाले होते. त्यांची मुलगी आणि इतर नातेवाईक महाडेश्वर यांच्या घरी आले होते. हे सर्वत्र एकत्र जमून आनंद साजरा करत असतानाच विश्वनाथ महाडेश्वर यांनी अखेरचा निरोप घेतल्याने महाडेश्वर कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.