कधी निसर्गाचा कोप तर कधी शेतकऱ्याप्रती शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांच आर्थिक नुकसान झाले आहेच. त्याचे गंभीर सामाजिक परिणाम दिसू लागले आहेत. शेतकरी असल्यामुळे अनेक मुलांची लग्न जमत नाहीत. संपूर्ण राज्यात अशी परिस्थिती आहे. एकट्या जळगावमध्ये जवळपास लाखभर मुलं विवाहाच्या प्रतीक्षेत आहेत. लग्नाचं वय निघून गेलं तरी लग्न जमत नसल्याचं वास्तव समोर आले.
शेतकऱ्यांच्या प्रति शासनाच्या उदासीन धोरणाबरोबर कधी निसर्गाचा कोप, यामुळे गेल्या दहा पंधरा वर्षात शेतीमध्ये लावलेला खर्चही मिळेत नाही. अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या केल्याची अनेक उदाहरणे राज्यभर आहेत. दिवसरात्र काबाड कष्ट करूनही जगाचं पोट भरणाऱ्या या पोशिंद्याला आपल्या स्वतःच्या कुटुंबाचं पोटभरणे अवघड झाल्याचं चित्र संपूर्ण जगाच्या समोर आले आहे. शेतकरी परिवारात आपली मुलगी दिली तर तिचं भविष्य काय असेल अशी चिंता मुलीच्या पालकांना सतावत आहे. त्यामुळेच मुलीच्या भविष्यासाठी पालकं शेतकऱ्यांच्या मुलाला मुली देण्यास टाळाटाळ करत आहेत. अनेकजण नोकरदारवर्गांना मुली देण्यास प्राधान्य देत आहेत. शिक्षण झालेल्या मुली शहरातमध्ये स्थायिक होतात, ते नोकरदाला लग्नासाठी प्राधान्य देतात.
मागील वीस पंचवीस वर्षांपूर्वी हुंडा देण्या घेण्याची अनिष्ट प्रथा समाजामध्ये होती. त्यामुळे गर्भलिंग निदान करण्यास फारसे कडक निर्बंध नसल्याने ,अनेक पालकांनी त्या काळी मुलीची जबाबदारी नको, म्हणून सर्रास गर्भ लिंग तपासणी करून मुलीचा गर्भ काढून टाकला. त्याचा परिणाम म्हणून मुलाच्या तुलनेत मुलींची संख्या कमी झाल्याने आज त्याचे परिणाम विवाह योग्य शेतकरी तरुणांना भोगावे लागत आहेत. ज्या मुली विवाह योग्य वयात आहेत त्यांचा ओढा नोकरी आणि बड्या व्यावसायिक मुलांकडे अधिक असल्याने शेतकरी मुलांना मुली विवाहसाठी तयार होताना दिसत नसल्याने दिवसेंदिवस ही समस्या गंभीर होताना दिसत आहे.
जळगाव जिल्ह्यात प्रत्येक गावात विवाहाचे वय निघून गेलेले किमान पन्नास ते शंभर तरुण असल्याचं शेतकरी संघटनेचे नेते एस बी नाना पाटील यांनी सांगितलं. दरम्यान, जळगावातील 12 एकर शेती असणारा तरुण अद्याप लग्नाच्या प्रतिक्षेत आहे. एबीपी माझाशी बोलताना तो म्हणाला की, मी पदवीधर आहे, माझ्याकडे 12 एकर शेती आहे. मी एखाद्या नोकरदारापेक्षा जास्त कमवतो. पण फक्त शेतकरी असल्यामुळे माझं लग्न जमत नाही. त्या 38 वर्षीय तरुणाचं नाव मनोज लोखंडे असं आहे. या मनोज लोखंडेसारखे अनेक तरुण जळगावमध्ये आहेत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेती आहे, कमाईही बक्कळ आहे. पण लग्नासाठी मुलगी मिळत नाही. शेतकरी असणं हा दोष आहे का? असा सवाल अनेकांनी केला आहे.