आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात.
या वारीमध्ये विठू नामाचा गजर तर होतोच तर पण त्याहीपेक्षा अधिक नामघोष घुमतो तो ‘ग्यानबा तुकाराम’ गजराचा. मग प्रश्न पडतो जर आराध्य दैवत विठ्ठल आहे मग गजर त्यांचे भक्त असलेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या नावाचा का?
पण यामागेही एक रंजक इतिहास आहे. आपण ते नाम सहज मुखी घेतो, त्यावर ताल धरतो, हरी रंगात रंगतो पण ती प्रथा नेमकी कधीपासून सुरू झाली ते जाणून घेऊया…
प्रस्थान सोहळे पार पडले. आता वारी पुणे ओलांडुन पुढे आली. तुकाराम महाराजांची पालखी यवत पर्यंत आली तर ज्ञानोबारायांची पालखी दिवे घाटातूनसासवड कडे निघाली आहे. या प्रवासात ‘ग्यानबा तुकाराम’ नामाचा अखंड गजर सुरू आहे.
पण तुम्हाला माहितीय का या हजारो वर्षांच्या पंढरीच्या वारीमध्ये पालखी परंपरा नव्हती. आधी केवळ भगवा ध्वज, तुळस आणि हरिनाम सोबत घेऊन पंढरीची वारी केली जायची. गावोगावातून लोक पंढरपूरला जायचे.. दिंड्य होत्या, पण पालखी नव्हती.
पण तुकाराम महाराज वैकुंठवासी गेल्यानंतर महाराष्ट्रात मोठी अराजकता माजू लागली. त्यावेळी पंढरीची वारी सामाजिक ऐक्याच प्रतीक होती. पण परकीय आक्रमनात आपल्यालाही आपली ताकद दाखवणे गरजेचे होते.. मग काय.. निर्णय झाला..
संत तुकाराम महाराजांचे वंशज नारायण महाराज यांचा शब्द त्यावेळी वारकरी संप्रदाय प्रमाण मनात होता, त्यात सरकार दरबारी म्हणजे त्यावेळच्या सरदार, राजे यांच्यामध्येही नारायण महाराजांनविषयी प्रचंड आस्था होती. मग या अराजकतेवर उपाय काय करायचा?.. म्हणून नारायण महाराजांनी एक उपाय काढला.
महाराज म्हणाले आपण वारीचे स्वरूप बदलू आणि दिंडी सोबत पालखी परंपरा सुरू करू. ज्यामध्ये वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी घातला असे संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांनी कळस रचला असे तुकाराम महाराज त्यांच्या पादुका घेऊन आपण पंढरपूरला जाऊ. आणि या पादुका आपण पालखी मधून पंढरपूरत घेऊन जाऊ.. आणि त्या दिवशीपासून पालखी परंपरा सुरू झाली.
पण त्यावेळी पालखी मध्ये सगळेच विठ्ठल विठ्ठल गजर करायचे, पण ज्यांनी संप्रदायाची सुरुवात केली आणि ज्यांनी कळस रचला अशा संतांची गजर व्हायला हवा म्हणून पंढरपूरच्या केशवराव बडवे यांनी ‘ज्ञानाबा तुकाराम’ असं भजन सुरू केलं आणि मग त्याचा पुढे ‘ग्यानबा- तुकाराम’ गजर झाला आणि मुखामुखातून गरजू लागला.. अशी ही दिव्य परंपरा या हरीनामामागे आहे.
पुढे संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्यासोबत सक;ल संतांच्या पालख्या पंढरपूरात जाऊ लागल्या आणि ही परंपरा अधिकच समृद्ध झाली.