राज्य शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमात लातूर जिल्हा राज्यात प्रथमस्थानी आहे. एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत साथरोगांशी निगडीत ‘रियलटाईम’ माहिती सुलभरित्या प्राप्त होण्यासाठी एकात्मिक आरोग्य माहिती व्यासपीठ (आयएचआयपी) ही नवीन ऑनलईन प्रणाली मागील तीन वर्षांपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. साथ उद्भवण्याच्या आधी धोक्याची सूचना देणारी चिन्हे आणि लक्षणे ओळखून वेळीच उपाययोजना करणे, हा या ऑनलाईन प्रणालीचा मुख्य उद्देश आहे.
कोविड लाटेचा कालावधी वगळता सदर प्रणालीचा वापर जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमार्फत करण्यात येत आहे. याकामी जिल्हास्तरीय साथरोग नियंत्रण कक्ष सर्व कर्मचाऱ्यांच्या संपर्कात राहून वेळीच माहिती भरुन घेण्याचे काम करत असल्याने क्षेत्रीय पातळीवरील कर्मचाऱ्यांना या कामाचे सातत्य राखणे शक्य झाले आहे. शासनाने विकसित केलेल्या आयएचआयपी प्रणालीमध्ये तीन स्तरावर माहिती संकलित करून साथरोग सर्वेक्षण केले जाते.
प्रथम उपकेंद्र स्तरावर साथरोगांशी संबंधित लक्षणांच्या आधारे आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जावून गृहभेटीमध्ये एस (सिंड्रोमिक) फॉर्ममध्ये ही माहिती संकलित केली जाते. हा फॉर्म भरताना ‘जिओ लोकेशन’चा वापर केला जातो. ज्यामुळे एखाद्या गावात एखाद्या विशिष्ट लक्षणांचे अधिक रुग्ण आढळून येत असल्यास साथीच्या धोक्याचे संकेत तालुका स्तरावर ऑनलाईन दिसून येतात, त्याचवेळी ते जिल्हा स्तरावर निदर्शनास येत असल्याने अशा गावात तत्काळ प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना राबविणे सोयीचे ठरते. त्यामुळे येऊ घातलेली साथ थोपविली जावून नागरिकांचे आरोग्य अबाधित राहते.
प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, सामान्य तथा उपजिल्हा रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र या सर्व स्तरावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुमानानुसार साथरोगांशी संबंधित पी (प्रिझम्प्टिव्ह) फॉर्म औषध निर्माण अधिकाऱ्यांमार्फत भरला जातो, आणि रुग्णाची प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर एल (प्रयोगशाळा तपासणी) फॉर्म प्रयोशाळा तंत्रज्ञामार्फत भरला जातो. हे तीनही फॉर्म वेळेत (रियलटाईम) भरले जात असल्याने राज्यस्तरावरुन गुणांकन करून प्रत्येक जिल्ह्याला क्रमवारी देण्यात आली असून या क्रमवारीत लातूर जिल्हा राज्यात अग्रस्थानी आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सर्वेक्षण टिमचे नियंत्रण जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. अर्चना पंडगे, जिल्हा साथरोग तज्ञ डॉ. आशुकेत वैरागे यांच्यासह जिल्हा आरोग्य पर्यवेक्षक सुनील कद्रे, डेटा मॅनेजर बाबु सैयद, डेटा एंट्री ऑपरेटर रमेश वाघमारे, ज्ञानेश्वर लोखंडे यांचे पथक आयएचआयपी प्रणालीवर वेळेत माहिती भरण्यासाठी नियमित पाठपुरावा करीत आहे.