चीनच्या पिपल्स लिब्रेशन आर्मीकडून अक्साई चीन परिसरात मोठ्या प्रमाणात निर्माण कार्य सुरू आहे. याठिकाणी चीनने अंडरग्राऊंड अड्डे बनवले आहेत. सॅटेलाईट छायाचित्रांतून याबाबत खुलासा झालाय. तसेच चीनने युद्धांची तयारी चालवल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.
चीनने नुकताच आपल्या देशाचा नकाशा जाहीर केला होता. यात चीनने अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश देशाचा भाग असल्याचे दर्शवले होते. चीनी मंत्रालयाकडून 28 ऑगस्ट रोजी हा नकाशा जाहीर तरण्यात आला होता. यावर भारत सरकारकडून आक्षेप घेण्यात आलाय. चीनने हा नकाशा समोर आणल्यानंतर सॅटेलाईट छायाचित्रांमधून अक्साई चीनमध्ये मोठ्या प्रमाणात निर्मिती कार्य सुरु असल्याचे दिसून आले. या परिसराचे डिसेंबर 2021 आणि ऑगस्ट 2023 मधील छायाचित्र तपासून पाहिले असता दोन्हीमधील फरक स्पष्टपणे जाणवतात.
चीनी सैन्याने अक्साई चीनच्या 15 चौरस किलोमीटरच्या प्रदेशात 6 ठिकाणी बंकर आणि अंडरग्राऊंड सुविधा उभारण्यात आल्याचे फोटोत दिसत आहे. हा भाग प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून 70 किलोमीटर अंतारावर आहे. याठिकाणी चीन कडून सैन्य तैनात करण्यात आले आहेत.ऑगस्टमधील छायाचित्रांमधून या भागात ये-जा करता येणारी उपकरणे, नविन रस्ते आणि प्रवेश ठिकाणे बांधल्याचे दिसतेय. तज्ञांच्या मते अंडरग्राऊड बांधणी उपकरांना, शस्त्रांना सुरक्षित ठेवण्यासाठी बांधण्यात आलेत.हवाई हल्ल्यापासून वाचण्यासाठीही ही बांधणी चीनच्या लष्कराला उपयोगाची ठरणार आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.चीनने सोमवारी जारी केलेल्या नकाशामध्ये, 1962 मध्ये गिळंकृत केलेला अक्साई चीन, अरुणाचल प्रदेश दाखवला आहे. अरुणाचल प्रदेश तिबेटचा दक्षिण भाग असल्याचा चीनचा दावा आहे.