गुंतवणूक केलेल्या रकमेवर ४५ दिवसांनंतर दरमहा १५ टक्के इतकी रक्कम मिळणार तसेच गुंतवणूक रक्कम १२ महिन्यानंतर परत देण्याचे आमिष दाखवून नाशिकामधील तिघांनी सोलापुरातील तब्बल ९२ जणांना ९४ लाखांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.
स्वाती लालूप्रसाद मुत्याल (वय २४, रा. नीलमनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन सुधाकर वरखडे (रा. ओमनगर, जेलरोड नाशिक), अमोल नरेंद्र खोंड व अरविंद मेहता (दोघे रा.नाशिक) या तिघांविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. फेब्रुवारी २०१९ मध्ये मनी सिक्रेट मल्टिट्रेड लिमिटेड कंपनीचे एजंट म्हणून गणेश चौखंडे, गणेश भोसले यांची ओळख झाली. सचिन वरखडेसह इतर दोघे कंपनीचे संचालक असल्याची माहिती यावेळी दिली.
त्यानंतर एजंटांनी कंपनीकडील गुंतवणुकीबाबतच्या विविध योजनांची माहिती दिली. दोन हजार पाचशे ते दोन लाख या पटीत गुंतवणूक करावी लागेल असेही सांगण्यात आले. विशेष म्हणजे गुंतवणूक केलेल्या रकमेवर ४५ दिवसानंतर दरमहा १५ टक्के रक्कम गुंतवणूकदारांना परत दिली जाणार आहे. तसेच वर्षानंतर गुंतवणूक रक्कमही परत केली जाणार असल्याचे आमिष दाखविण्यात आले.
कमी वेळेत जादा रक्कम मिळेल या आशेने फिर्यादीस चार लाख १० हजार इतकी रक्कम गुंतविण्यास एजंटांनी भाग पाडले, अशाच प्रकारे आठ महिन्यात सोलापुरातील ९२ व्यक्तींना ९३ लाख ९४ हजार रुपयांची रक्कम गुंतविण्याचे आमिष दाखविले. परंतु चार वर्षानंतरही गुंतवणूकदारांना कोणत्याही प्रकारचा परतावा देण्यात आला नाही. जादा परताव्याच्या आमिषाने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसात धाव घेतली. अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे फौजदार पवार हे करीत आहेत.