शाळा सुरु झाल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुली आणि अनुसूचित जाती-जमाती व दारिद्रयरेषखालील मुलांना एक गणवेश मिळाला. त्यानंतर दुसऱ्या गणवेशाचा निधी आला. आता खुल्या प्रवर्गातील मुलांसाठी दोन गणवेश आणि सर्वच मुला-मुलींसाठी बुट व दोन सॉक्ससाठी १६ कोटी मिळाले, पण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या टेबलावर मंजुरीसाठी निधीची फाइल पडून आहे. त्यांच्या मंजुरीनंतर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांना गणवेश व बूट खरेदीसाठी निधी मिळणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळांमध्ये जवळपास दोन लाख १६ हजार विद्यार्थी (पहिली ते आठवी) शिक्षण घेत आहेत.महापालिकेच्या ५८ शाळांमध्ये साडेपाच हजार विद्यार्थी आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्यास दोन गणवेश व एक बूट, दोन सॉक्स मिळणार आहेत. खासगी व शासकीय शाळांमधील सर्वच विद्यार्थ्यांना एक गणवेश समान असावा म्हणजेच स्काउट गाईडसारखा गणवेश शासनाकडून दिला जाईल, अशी भूमिका शासनाची होती. पण, त्या निर्णयाची यंदा अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे पहिल्यांदा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी एकाच गणवेशाचा निधी वितरित झाला.