खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांची टर्म एप्रिल २०२४ मध्ये संपणार आहे. पण, निवडणुकीनंतर त्यांच्यामागे बनावट जातवैधता प्रमाणपत्राची चौकशी लागली होती. सोलापूरच्या जात पडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र बनावट ठरविल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यावर खासदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जातवैधता प्रमाणपत्राची फेरचौकशी सुरु झाली असून त्यासाठी पुन्हा दक्षता पथक नेमले जाणार आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत डॉ. महास्वामी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा एक लाख ५८ हजार मतांनी पराभव केला. वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांचाही या निवडणुकीत पराभव झाला होता. विजयाचा आनंद साजरा करतानाच सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गायकवाड यांच्यासह इतर तिघांनी खासदार डॉ. महास्वामी यांच्याकडील जातवैधता प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार जात पडताळणी समितीकडे केली होती.


















