लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर, शनिवारी मतदानोत्तर कल चाचण्यांचे (एक्झिट पोल) कल प्रसिद्ध झाले असले, तरीही राज्यातील काही जागांवर प्रचंड चुरस आहे. शिरूर, सातारा आणि नगरसह दहा जागांवरील निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली असून, या ठिकाणाच्या लोकसभा निवडणूक निकालांवरच राज्यात महायुती किंवा महाविकास आघाडीला नेमक्या किती जागा मिळणार, याचे भविष्य ठरवणार असल्याचे सध्या दिसते आहे.
राज्यभरात यंदाची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असल्याचे प्रतिबिंब ‘एक्झिट पोल’मध्ये उमटले आहे. विविध संस्थांनी केलेल्या ‘एक्झिट पोल’मध्ये शिरूर, सातारा, नगर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, भिवंडी, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम आणि उस्मानाबाद या दहा जागांवर अत्यंत चुरशीची लढत झाल्याचे चित्र दिसते आहे.
कल जाहीर करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी जिंकण्याची शक्यता वर्तविण्यात आलेल्या उमेदवारांची जिंकण्याची शक्यता एक ते चार टक्क्यांच्या दरम्यान आहे. सर्वेक्षणामध्ये किमान पाच टक्क्यांहून अधिक मताधिक्य मिळत असलेले उमेदवार जिंकण्याची शक्यता सर्वाधिक असते. सर्वेक्षणात या दहाही जागांवर अत्यंत चुरशीची लढत झाल्याने या ठिकाणचे निकाल राज्याचे चित्र बदलू शकतात, अशी प्रतिक्रिया ‘एक्झिट पोल’साठी संबंधित प्रतिनिधींकडून व्यक्त करण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात शिरूर आणि सातारा या दोन्हीही मतदारसंघातील निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली आहे. बहुतांश ‘एक्झिट पोल’मध्ये या जागा महाविकास आघाडीला मिळणार असल्याचा कल जाहीर करण्यात आला आहे. या दोन्हीही जागांवर जिंकण्याची शक्यता वर्तविलेल्या उमेदवारांचे मताधिक्य अत्यंत कमी असल्याचे सर्वेक्षणात दर्शविण्यात आले आहे.
असाच प्रकार नगर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, भिवंडी, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम आणि उस्मानाबाद या आठही जागांवर असल्याने राज्यात नेमकी कोणाची सरशी होणार, याचा अंदाज वर्तविणे कठीण झाल्याचे सांगितले जात आहे.
काय परिणाम होणार?
अत्यंत चुरशीची लढत झालेल्या दहा मतदारसंघांपैकी पाच जागा भाजप जिंकेल, असे ‘एक्झिट पोल’मध्ये दर्शविण्यात आले आहे. तर, उर्वरित पाच जागांमध्ये प्रत्येकी एक जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष; तसेच तीन जागा या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांना मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भाजपला दर्शविण्यात आलेल्या पाच जागांवरील निकाल विरोधात गेले, तर महायुतीला त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविले जात आहे.