सोलापूर : सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज पहिल्याच दिवशी विविध ७ निवडणूक कार्यालयाअंतर्गत उमेदवारी अर्ज घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. इच्छुक उमेदवार आणि प्रतिनिधीनी प्रत्येकी चार नामनिर्देशान पत्र घेतले. पहिल्याच दिवशी १ हजार ७४ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली.आजच्या पहिल्याच दिवशी माजी सभागृह नेते सुरेश पाटील,शिवानंद पाटील यांच्यासह माजी नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत.मंगळवारी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने नामनिर्देशन अर्ज विक्री व स्वीकारण्याची प्रक्रिया सोलापूर महानगरपालिका प्रशासनामार्फत नियोजित वेळापत्रकानुसार राबविण्यात येत आहे. महापालिका निवडणुकीसाठी नॉर्थकोट प्रशालेच्या आवारात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवार, २३ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. २३ ते ३० डिसेंबर या कालावधी सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत दोन सुटीचे दिवस वगळता अर्ज भरण्यासाठी सहा दिवस मिळणार आहेत. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी नॉर्थकोट प्रशालेत प्रभागनिहाय सात निवडणूक कार्यालयांची स्थापना करण्यात आली आहे. २६ महापालिकेच्या एकूण प्रभागातील १०२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या प्रभागातील उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अ, ब, क, ड या गटानुसार भरून घेतले जात आहेत. नॉर्थकोट प्रशालेत प्रभागनिहाय सात निवडणूक कार्यालयात हे अर्ज स्वीकारले गेले. नॉर्थकोट प्रशालेत सात निवडणूक कार्यालयांसह आचारसंहिता कक्ष तयार करण्यात आला आहे.
विविध सात कार्यालयनिहाय
अर्ज विक्रीचा तपशील असा
निवडणूक निर्णय अधिकारी -१ : १६७,
निवडणूक निर्णय अधिकारी-२ : १९२
निवडणूक निर्णय अधिकारी-३ : १३०
निवडणूक निर्णय अधिकारी ४ : १२०
निवडणूक निर्णय अधिकारी-५ : १७१
निवडणूक निर्णय अधिकारी-६ : १२६
निवडणूक निर्णय अधिकारी-७ : १६८
आज एकूण १०७४ नामनिर्देशन अर्जांची
विक्री झाली आहे.
खुल्या प्रवर्गासाठी ५ हजार तर आरक्षितसाठी
२५०० रूपये अनामत रक्कम
सोलापूर महानगरपालिकेने निवडणूकीसाठी नॉर्थकोट प्रशालेत ७ निवडणूक निर्णय अधिकारी नेमणूक करून त्यांच्याकडे प्रत्येकी ४ प्रभागातील उमेदवारी अर्ज घेणे आणि दाखल करून घेण्याची सोय करण्यात आली आहे. १०० रूपयांना अर्ज मिळत असून उमेदवारी दाखल करताना खुल्या गटासाठी ५ हजार रूपये तर आरक्षित गटासाठी २५०० रूपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे.
मनपा प्रशासकीय इमारतीतील एक खिडकी कक्षात मोठी गर्दी
महापालिकेने अर्ज दाखल करताना ज्या एनओसी घेणे गरजेचं आहे त्यासाठी एक खिडकी योजना महापालिका प्रशासकीय इमारतीमध्ये सुरू केली आहे. या ठिकाणी चार खिडक्यांची सोय करण्यात आली आहे.
सकाळी पालिकेत एक खिडकीवर झुंबड उडाली होती.
भारतरत्न डॉ. आंबेडकर पुतळा ते डफरिन चौक रस्ता वाहतुकीसाठी बंद
नॉर्थकोट प्रशालेत उमेदवारी अर्ज घेण्यासाठी लोक रांगेत थांबले होते. यात महिलांचाही समावेश अधिक होता. पोलीस प्रशासनानं भारतरत्न डॉ. आंबेडकर पुतळा ते डफरिन चौक हा रस्ता एका बाजूने बॅरिकेटींग करून वाहनांसाठी बंद केला होता. सकाळी 11 ते तीन वाजे दरम्यान हा रस्ता बंद करण्यात आला. महापालिका आवारात तसेच स्मृती मंदिर आवारात पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्त तगडा होता.
१९ पानांचा उमेदवारी अर्ज भरावा लागणार
महापालिकेसाठी उमेदवारांना १९ पानांचा उमेदवारी अर्ज भरावा लागेल. पहिल्या चार पानांवर उमेदवाराचे संपूर्ण नाव, प्रभाग क्रमांक, जागा क्रमांक, राखीव प्रवर्ग, वैयक्तिक माहिती आणि उमेदवाराचा मतदार यादीतील तपशील, सूचक अनुमोदकाची माहिती आणि सही आदी माहिती भरावी लागेल.शपथपत्रामध्ये स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती. १२ सप्टेंबर २००१ नंतर दोनपेक्षा जास्त अपत्ये नसल्याची माहिती द्यावी लागेल. अन्यथा हा उमेदवार अपात्र होऊ शकतो. उमेदवारावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची आणि न्यायालयीन दाव्यांची माहिती जोडणे बंधनकारक आहे.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केली पाहणी
नॉर्थकोट प्रशाला येथील विविध 7 निवडणूक अधिकारी कार्यालय (आरओ) आचारसंहिता कक्ष यासह विविध कार्यालयांची महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज सकाळीच अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. विविध सूचना दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, विद्युत अभियंता राजेश परदेशी , कामगार कल्याण अधिकारी अजितकुमार खानसोळे, जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
























