भूमीपुत्रांच्या न्याय हक्कासाठी सतत लढा देणाऱ्या संघर्ष समितीतील नेत्यांनी व पदाधिकारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभर भरघोस केलेल्या कामांवर समाधान व्यक्त करीत तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी 27 गावाचा केलेला कायापालट आदी गोष्टींवर प्रेरित होऊन कल्याण डोंबिवली महानगर पालिका अंतर्गत 27 गावातील राष्ट्रवादीच्या नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भगवा हातात घेतला. ठाणे येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेचा भगवा त्यांच्या हाती देत सर्वांचे जोरदार स्वागत केले.
ठाणे येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते गुलाब वझे यांच्या नेतृत्वाखाली 27 गावातील मानपाडा, संदप, भोपर, नांदिवली, सोनारपाड, घारीवली, निळजे, खिडकाळी आदी गांवातील भूमिपुत्र तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील लोकं शेकडोंच्या संख्येने हजर होते. यामध्ये महिलांही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा भगवा त्यांच्या हातात देऊन त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी शिवसेना झिंदाबाद, शिंदे साहेब आगे बढो हम आपके साथ है ! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे झिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी गुलाब वझे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामामुळे आम्ही शिवसेनेत प्रवेश केला आहे. 27 गावाचा विकास फक्त मुख्यमंत्री शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेच करू शकतात. येथील भूमीपुत्रांचे प्रश्न सोडविण्यासाठी खंबीर नेतृत्व हवे होते. संत सावळाराम महाराज स्मारक उभारण्याचे काम होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व.दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे सहकार्य नक्कीच मिळणार आहे. आमचा खासदार डॉ. शिंदे यांच्यावर पूर्ण विश्वास असून संघर्ष समितीला पुढे काम करण्यास वाव मिळेल असा भूमिपुत्रांचा विश्वास आहे. यावेळी गुलाब वझे यांच्यासह दत्ता वझे, शरद पाटील, विजय पाटील, वर्गिस म्हात्रे, नायकर यासह शेकडो भूमीपुत्रांनी शिवसेनेत प्रवेश केला.