सैन्य सरावादरम्यान नदीत पाणी वाढून अपघात
लेह, 29 जून (हिं.स.) : भारत-चीन सीमेवरील लद्दाखमध्ये सैन्य सरावादरम्यान नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने सैन्याच्या 5 जवानांना हौतात्म्य आले. स्थानिक दौलत बेग ओल्डी परिसरात ही दुर्घटना घडली.
दौलत बेग हे ओल्डी काराकोरम रेंजमध्ये वसलेले आहे, या ठिकाणी लष्कराचा तळ आहे.लडाखमधील एलएसीजवळ अचानक आलेल्या पुरात लष्कराचे 5 जवान बुडाले. आर्मी टँक नदीचा खोल भाग ओलांडत असताना तिथे अडकला. यावेळी पाण्याची पातळी अचानक वाढल्याने ते पाण्याने भरले, त्यामुळे लष्कराचे जवान बुडाले. सध्या शोधमोहीम सुरू असून जवानांचा शोध घेतला जातोय. याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातावेळी रणगाड्यात लष्कराचे 5 जवान होते. यामध्ये एक जेसीओ आणि 4 सैनिकांचा समावेश आहे. एक जवान सापडला असून उर्वरित चौघांचा शोध सुरू आहे. दौलत बेग ओल्डी येथे ज्या रणगाड्याला अपघात झाला तो भारतीय लष्कराचा टी-72 टँक होता. भारताकडे 2400 टी-72 रणगाडे आहेत. भारतीय लष्कर अनेक वर्षापासून या रणगाड्यांचा वापर करत आहे.
दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करुन घटनेवर दु:ख व्यक्त केले. लद्दाखमध्ये नदी ओलांडताना झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत आपल्या 5 शूर भारतीय सैन्याच्या जवानांना प्राण गमवावे लागल्याने अतिशय दु:ख झाले आहे. शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. देश खंबीरपणे उभा आहे. या दु:खाच्या काळात त्यांच्यासोबत आहे असे राजनाथ यांनी आपल्या संदेशात नमूद केलेय.