जम्मू, 29 जून (हिं.स.) : जम्मू-काश्मीरातील जगप्रसिद्ध अमरनाथ यात्रेला आज, शनिवारी सुरुवात झाली. बालटाल आणि नुनावान कॅम्पमधून अमरनाथ हुफेला जाण्यासाठी भाविकांची पहिली तुकडी रवाना झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अमरनाथ गुहा समुद्रसपाटीपासून सुमारे 3800 मीटर उंचीवर आहे जिथे बर्फाचे शिवलिंग नैसर्गिकरित्या तयार होते. तब्बल 48 किलोमीटर लांबीच्या नुनवान-पहलगाम मार्ग आणि 14 किमी लांबीच्या बालटाल मार्गावरून हा प्रवास सुरू झाला आहे. अमरनाथ यात्रेसाठी हे दोन्ही मार्ग पारंपारिक आहेत.
संबंधित उपायुक्त आणि पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन्ही मार्गांवर यात्रेकरूंचे गट रवाना केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी जम्मूच्या भगवती नगर येथील यात्री बेसिक कॅम्पमधून 4,603 यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला.
यात्रेकरू दुपारी काश्मीर खोऱ्यात पोहोचले, तेथे प्रशासन आणि स्थानिक लोकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यात्रेकरू गुफा मंदिरात बर्फापासून बनलेल्या शिवलिंगाची पूजा करतील. यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्था कडक करण्यासाठी पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल, इंडो-तिबेट सीमा पोलीस आणि इतर निमलष्करी दलातील हजारो सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यावेळी ही यात्रा केवळ दीड महिना चालणार असून 19 ऑगस्टला ती संपणार आहे