समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर पुढे आली माहिती
सांगली, 29 जून (हिं.स.) : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर जालना कडवंची गावाजवळ 2 वाहनांच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झालाय. हा अपघात राँग साईड ड्रायव्हिंगमुळे घडल्याची माहिती तपासात पुढे आलीय.
जालन्याजवळील कडवंची गावानजीकच्या चॅनल क्रमांक 351 वर शुक्रवारी मध्यरात्री स्विफ्ट डिझायर कार (क्र. एमएच-12 एमएफ-1856) पेट्रोल भरून राँग साईडने निघाली. त्याचवेळी नागपूरहून-मुंबईकडे जाणाऱ्या ईरटीका कार (क्र. एमएच-47 बीपी 5478) यांच्यात भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही कारचा अशरक्ष: चेंदामेंदा झाला. या अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर समृद्धी माहामार्गावर वाहतूक कोंडी झाली. क्रेनच्या साह्याने दोन्ही कार बाजूला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. दरम्यान स्विफ्ट डिझायर कार राँग साईड गेल्यामुळे हा अपघात झाल्याचे निदर्शनास आलेय.
या अपघातात इरटीका कारमधील फयाज शकील मंसुरी, फैजल शकील मंसूरी, अल्थमेश मंसूरी, प्रदीप लक्ष्मण मिसाळ, संदीप माणिक बुधवंत, विलास सुभाष कार्यदे आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. तर 3 जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर स्विफ्ट डिझायर कारमध्ये 4 प्रवासी होते. त्यांनाही तत्काळ ऍम्ब्युलन्सने रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान, महामार्ग परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस निरीक्षक गिरी आणि पोलीस स्टेशन तालुका येथील पोलीस निरीक्षक उनवणे पुढील तपास करीत आहेत