भारतातील प्रसिद्ध टाटा समुहाच्या एअर इंडियाने विमान वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठा करार केला आहे. टाटा समूह एकूण ४७० विमाने खरेदी करणार आहे. टाटाने विमान वाहतूक क्षेत्रातील आघाडीची कंपनी, अमेरिकेची बोइंग आणि युरोपची एअरबस कंपनी यांच्याशी हा करार केला आहे. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या करारासाठी भारताचे अभिनंदन केले आहे यावरून या कराराचे महत्त्व किती आहे याचा अंदाज आपण लावू शकतो.
टाटा सन्स या एअर इंडियाची मालकी असलेल्या कंपनीने म्हटले आहे की ही विमानसेवा सुरक्षा, ग्राहक सेवा, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, नेटवर्क आणि मानव संसाधनांच्या दिशेने मोठ्या परिवर्तनाच्या प्रवासावर आहे. टाटा समूह ट्रिलियन डॉलर्स खर्चून अत्याधुनिक बोईंग आणि एअरबस विमाने खरेदी करणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याव्यतिरिक्त यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीही हा करार त्यांच्या देशासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे. सुनक यांनी भारतासोबत व्यावसायिक संबंध कायम ठेवण्यावरही भर दिला. जर आपण रक्कम पाहिली तर हा करार ८० अब्ज डॉलर्स म्हणजेच ६.४० लाख कोटी रुपयांचा आहे.
या ऑर्डरमध्ये ४० एअरबस A350s, २० बोईंग 787s आणि १० बोईंग 777-9s वाइड-बॉडी असलेली विमाने, तसेच २१० एअरबस A320/321 Neos आणि 190 बोईंग 737 MAX सिंगल-आइसल विमानांचा समावेश आहे. अशा प्रकारे एअर इंडिया एकूण ४७० विमाने खरेदी करणार आहे. यामध्ये बोईंगच्या २२० आणि एअरबसच्या २५० विमानांचा समावेश आहे.
एअर इंडियाच्या मते, नवीन विमान २०२३ च्या अखेरच्या महिन्यांपर्यंत सेवेत येईल. २०२५ च्या मध्यापर्यंत बहुतेक नवीन विमाने एअर इंडियाच्या ताफ्यात सामील होतील. एअर इंडियाचे चेअरमन एन चंद्रशेखर म्हणाले, ही नवी विमाने एअरलाइनच्या ताफ्याचे आधुनिकीकरण करतील आणि याचे जागतिक नेटवर्क मोठ्या प्रमाणावर वाढवतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर इंडिया-एअरबस व्यवहाराला “ऐतिहासिक करार” म्हणून संबोधले, जे भारत आणि फ्रान्स यांच्यातील घनिष्ठ संबंधांचे प्रतिबिंब दर्शवते. या एअरबसचे ऑपरेशन ब्रिटन आणि फ्रान्स या दोन्ही देशांमध्ये आहे. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले की, एअर इंडियाने एअरबससोबत २५० विमानांच्या खरेदीसाठी केलेला करार भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक आणि मैत्रीपूर्ण भागीदारीमध्ये मैलाचा दगड ठरेल.
यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले की, एअर इंडिया, एअरबस आणि रोल्स-रॉयस यांच्यातील ऐतिहासिक करार यूकेच्या भरभराटीच्या वाटेवर
असलेल्या एरोस्पेस क्षेत्रासाठी अमर्याद वाढ असल्याचे दर्शविते. ते म्हणाले की या करारामुळे डर्बी ते वेल्सपर्यंत उत्पादन क्षेत्रात चांगल्या पगाराच्या नोकऱ्या आणि नवीन संधी निर्माण होतील, यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन म्हणाले की, कोणत्याही भारतीय विमान कंपनीने दिलेली ही केवळ सर्वात मोठी ऑर्डरच नाही तर कोणत्याही एअरलाइनने, कुठेही, कधीही दिलेली सर्वात मोठी सिंगल एअरक्राफ्ट ऑर्डर आहे. ही ऑर्डर भारताच्या विलक्षणतेची आणि विकासाच्या अनोख्या संधींची साक्ष देतो.