भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) चंद्रयान-3 च्या लँडरला चंद्रावर उतरवण्यासाठी 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.30 ते 6.30 वाजेच्या दरम्यानचा वेळी निश्चित केलाय. परंतु, जर लँडिंगसाठी योग्य ठिकाण न आढळल्यास शास्त्रज्ञ लँडिंगच्या 2 तास आधी आपला निर्णय बदलू शकतात. त्यानंतर हे लँडिंग 27 ऑगस्ट रोजी केली जाईल असा बॅकअप प्लान इस्त्रोने तयार केलाय.
गुजरातच्या अहमदाबाद येथे स्पेस अप्लिकेशन सेंटर (एसएसी) नावाचे इस्त्रोचे केंद्र आहे. या केंद्राचे संचालक नीलेश देसाई यांनी सांगितले की 23 ऑगस्ट रोजी लँडिंगच्या 2 तास आधी इस्रोचे मुख्य शास्त्रज्ञ लँडिंग करायचे की नाही याचा निर्णय घेतील. यामध्ये आम्हाला उतरण्यासाठी योग्य जागा मिळाली की नाही हे पाहणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. लँडरची परिस्थिती कशी आहे ? तसेच चंद्राच्या वातावरणाची आणि पृष्ठभागाची स्थिती काय आहे ? ते लँडिंगसाठी योग्य आहे का? या सर्वाची लॅंडिंग पूर्वी खात्री केली जाईल. यावेळी काही त्रुटी सापडल्या किंवा कोणतीही अडचण निर्माण झाल्यास 27 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चे लँडिंग करण्यात येईल असे देसाईंनी स्पष्ट केले.
चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर सुरक्षितपणे उतरवण्यासाठी एलएचडीएसी कॅमेरा तयार करण्यात आला आहे. याची निर्मिती स्पेस अॅप्लिकेशन सेंटर, अहमदाबाद येथे करण्यात आली आहे. यासह, लँडिंगच्या वेळी आणखी काही पेलोड्स मदत करतील, त्यामध्ये लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेरा (एलपीडीसी), लेझर अल्टिमीटर (एलएएसए), लेझर डॉप्लर व्हेलॉसिटीमीटर (एलडीव्ही) आणि लँडर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी कॅमेरा (एलएचव्हीसी) यांचा समावेश आहे. विक्रम लँडर जेव्हा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, तेव्हा त्याचा वेग सुमारे 2 मीटर प्रति सेकंद असेल. परंतु, क्षैतिज गती प्रति सेकंद 0.5 मीटर असेल. विक्रम लँडर 12 अंश वळण असलेल्या उतारावर उतरू शकतो.ही सर्व उपकरणे विक्रम लँडरला हा वेग, दिशा आणि सपाट जमीन शोधण्यात मदत करतील. ही सर्व उपकरणे लँडिंग करण्यापूर्वी सुमारे 500 मीटर अंतरावरून कार्यान्वित होतील.
चांद्रयान-3 च्या लँडरशी संपर्क करण्यासाठी इस्रोने दोन माध्यमांचा अवलंब केला आहे. पहिली गोष्ट म्हणजे यावेळी चांद्रयान-3 मध्ये ऑर्बिटर पाठवण्यात आले नाही. त्याच्या जागी प्रोपल्शन मॉड्यूल पाठवण्यात आले आहे. ज्याचा उद्देश फक्त चांद्रयान-3 च्या लँडर मॉड्यूलला चंद्राच्या जवळ आणण्याचा होता. याशिवाय, लँडर आणि बंगळुरूमध्ये स्थित इंडियन डीप स्पेस नेटवर्क (आयडीएसएन) यांच्यात संपर्क स्थापित केला जाणार होता.