बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू, अंदामान निकोबार बेटांवर पावसाची शक्यता हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवली आहे.
आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार केरळ, अंदमान आणि निकोबार बेटांवर आणि तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलवरील वेगळ्या ठिकाणी लक्षणीय पावसाची नोंद झाली आहे. केरळमध्ये कोझिकोड, तिरुवनथपुरम, कोट्टायम, इडुक्की, त्रिशूर तर तामिळनाडूमध्ये नागपट्टिनम, थुथुकुडी, कराईकल या भागात आजही पावसाची शक्यता आहे. दरम्यान तामिळनाडू आणि केरळमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यासह देशात थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. मध्य महाराष्ट्रासह राज्यात इतर भागात गारवा वाढला आहे. महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील तापमानातही घट झाली आहे. मुंबई, ठाणेसह कोकण किनारपट्टीसह गोव्यात गारठा वाढला आहे.
यासोबतच छत्तीसगड, तेलंगणा, रायलसीमा, किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि यानाम आणि अरुणाचल प्रदेशात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त आहे. झारखंड आणि आसाम आणि मेघालयमध्ये अनेक ठिकाणी, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटकमध्ये काही ठिकाणी तसेच जम्मू-काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, कोकण आणि गोवा, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल, केरळ आणि माहे, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा आणि उप-हिमालय पश्चिम बंगाल आणि सिक्कीम तापमान सामान्यपेक्षा कमी आहे.