छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे दामिनी पथकाने साध्या गणवेशात लग्न मंडप गाठला. तासभर मंडपात बसून सर्व हालचालींवर लक्ष ठेवून होते. दामिनी पथकाने नवरदेव नवरी मंडपात येतात उपनिरीक्षक कांचन मिरधे यांनी दोघांची विचारपूस करायला सुरुवात केली. यानंतर असं काही समोर आलं की थेट लग्न सोहळाच थांबवावा लागला.
शहरातील पडेगाव भागामध्ये १५ वर्षाची नवरी आणि २० वर्षाच्या नवरदेवाचा विवाह पार पडत असल्याची माहिती दामिनी पथकाला मिळाली. या यावेळी साध्या वेशात लग्न मंडपात बसून असलेल्या दामिनी पथकाने हा बालविवाह रोखला. यावेळी वधूची आई म्हणाली की, ‘मॅडम मी जुने भांडे करते. पतीची साथ नाही. पदरात दोन मुली आहेत. हा जमाना किती वाईट आहे तर तुम्हाला माहितच आहे. यामुळे डोक्यावरचं ओझं कमी करण्यासाठी आणि चांगली सोयरीक आल्यामुळे मुलीचं लग्न लावत आहे. यामुळे हे लग्न होऊ द्यावं’ अशी विनंती केली. मात्र, कायद्याने हा गुन्हा असल्यामुळे त्यांना समजून सांगत पोलिसांनी हा बालविवाह रोखला.
या प्रकरणी दामिनी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील वीस वर्षीय नवरदेव व पडेगाव भागातील साईनगर येथील १५ वर्षीय नवरी यांचा बालविवाह होत असल्याची माहिती उपनिरीक्ष कांचन मिरधे यांनी मिळताच त्यांनी पथकात सहाय्यक फौजदार लता जाधव, अंमलदार संगीता परळकर, अमृता भोपळे, सुरेखा कुकलारे आणि चालक मनीषा तायडे यांना घेऊन साध्या गणवेशात लग्न मंडप गाठला.
दरम्यान, तासभर मंडपात बसून सर्व हालचालींवर लक्ष ठेवून होते. दामिनी पथकाने नवरदेव नवरी मंडपात येतात उपनिरीक्षक कांचन मिरधे यांनी दोघांची विचारपूस करायला सुरुवात केली. वयाचे पुरावे मागितले असता मुलीचे वय १५ वर्षे असल्याचं लक्षात आलं. यामुळे कायद्याने हा बालविवाह करता येणार नाही अशी समजून काढण्यात आली.
विवाह सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या वऱ्हाडी मंडळींनी धामणी पथकाने विवाह रोखल्यानंतर अस्वस्थता पसरली. यावेळी वधू-वर व त्यांच्या आई वडिलांना पोलिसांनी पोलीस ठाण्यात घेऊन गेले होते. लग्नाची तयारी पूर्ण झाली होती. त्यामुळे दुपारनंतर वराडी मंडळींनी जेवण करून जाण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.