माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर करण्यावरून महायुतीमधील घटक पक्षांतील नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर व भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली असून, फलटण तालुक्यात कोण ठरणार बाहुबली? याबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत.
फलटण तालुक्यावर विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांचे गेली तीस वर्षे वर्चस्व आहे. आमदार रामराजे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून कृष्णेच्या पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न अत्यंत कौशल्याने सोडविला. पाच वर्षांचा कालावधी उपलब्ध असताना राज्याच्या वाट्याच्या ५९४ टीएमसी पाण्याचा वापर दाखवून त्यावरील राज्याचा हक्क अबाधित तर राखलाच; पण फेरवाटपात आणखी ८१ टीएमसी पाणी मिळविण्यात व कायम दुष्काळी पट्टा बागायती करण्यात ते यशस्वी ठरले.
त्याचबरोबर रामराजे यांना खंडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या शेकडो एकर जमिनी पाटपाण्याच्या हक्कासह सन्मानपूर्वक परत करण्यात मोठे यश प्राप्त झाले. धोम-बलकवडीसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे कायम दुष्काळी पट्ट्यात पाणी पोचविताना राज्यातील अन्य दुष्काळी तालुक्यांसाठी विविध पाटबंधारे योजना राबविताना सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव उत्तर, खंडाळा या तालुक्यांतील कायम दुष्काळी तालुक्यांना प्राधान्याने कृष्णेचे पाणी मिळाले पाहिजे, यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत.