लातूर, २५ जून, (हिं.स) : भारत निवडणूक आयोगाने 1 जुलै 2024 या अर्हता दिनाकांवर आधारित छायाचित्र मतदार यादीचा (दुसरा) विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 25 जून 2024 ते 24 जुलै 2024 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याद्वारे घरोघरी भेटी देवून तपासणी, पडताळणी, योग्य प्रकारे फोटो तसेच मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करण्यात येणार आहे.
मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी 25 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध केली जाईल. तसेच 25 जुलै ते 9 ऑगस्ट 2024 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. या काळातील शनिवार, रविवारी दावे व हरकती स्वीकारण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत 19 ऑगस्ट 2024 पर्यंत राहणार असून 20 ऑगस्ट 2024 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी केली जाणार आहे.
1 जुलै 2024 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे सर्व नागरिक मतदार म्हणून नाव नोंदणीस पात्र होणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अथवा अद्याप मतदार म्हणून नोंदणी केली नसल्यास, अशा नागरिकांना छायाचित्र मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत आपले नाव मतदार म्हणून नोंदवता येणार आहे. भारत निवडणूक आयोग व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार प्रत्येक मतदान केंद्रांवर विशेष मोहिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
छायाचित्र मतदार ओळखपत्र हे मतदारांची ओळख पटविण्यासाठी असून मतदारांचे नाव मतदार यादीत असेल तरच मतदान करता येते. त्यामुळे नागरिकांकडे मतदार ओळखपत्र असले तरीही मतदार यादीत नाव असल्याची खातरजमा करून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क गमावण्याची वेळ येणार नाही. तरी नागरीकांना आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करण्यासाठी https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा Voter Helpline App या मोबईल अॅप चा वापर करावा. तसेच, यापूर्वी प्रसिध्द करण्यात आलेली मतदार यादी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचेकडे उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
मतदार यादीचा विशेष संक्षिप्त कार्यक्रमांतर्गत लातूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व मतदान मदत केंद्र येथे (वोटर हेल्प सेंटर) मतदार यादीत नाव नोंदणीसाठी विहित नमुन्यातील अर्ज स्विकारले जातील. तसेच मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी किंवा आपल्या नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी https:/Voters.eci.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. तरी लातूर जिल्ह्यातील 1 जुलै 2024 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण करणारे व अद्याप मतदार म्हणून नोंदणी न केलेल्या सर्व पात्र नागरीकांनी छायाचित्र मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत विहित नमुन्यातील अर्ज भरून आणि आवश्यक कागदपत्रे सादर करून आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.