मंगळवेढा : येथील भूमी अभिलेख कार्यालयात ग्रामीण भागातून येणार्या नागरिकांची नोंदीची व अन्य कामे वेळेत होत नसल्याने सुज्ञ नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करुन याचा निषेध म्हणून चक्क अधिकार्यासह कर्मचार्यांना कोंडून ठेवण्याचा प्रकार घडला असून येथील अधिकार्याची उचलबांगडी करुन सक्षम अधिकारी नेमण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
या कार्यालयाअंतर्गत नोंद असलेल्या अनेक दस्तऐवज मध्ये वारस नोंद करणे, बँक कर्जाचा बोजा चढवणे,नवीन नोंदी प्रमाणित करणे, अज्ञान पालन नाव लावणे,सज्ञान झाल्यावर नाव कमी करणे, हक्कसोडपत्र,बक्षीसपात्रासाठी आवश्यक दस्त उपलब्ध करणे, यासह अन्य कामासाठी महिनानोमहिने नागरिक हेलपाटे घालत आहेत. याशिवाय जमीन मोजणीचे काम देखील याच कार्यालयाशी निगडीत आहे मात्र या कार्यालयाकडून या नागरिकांची कामे वेळेत पुर्ण केली जात नाहीत, प्रत्येक वेळेला हेलपाटे मारुनही नागरिकांची कामे पुर्ण होत नसल्याने गेल्या अनेक दिवसापासून नागरिक संताप व्यक्त करीत होते. त्याची परिसीमा आज सुज्ञ नागरिकांनी ओलांडली व चक्क भूमी अधिक्षक यांच्यासह सर्व कर्मचार्यांना गेटला कुलूप लावून जवळपास तासभर कोंडून ठेवत अधिकारी व कर्मचार्यांचा निषेध व्यक्त केला. येथील भूमी अधिक्षक एक महिला अधिकारी असून या महिला अधिकार्याचे कुठल्याच कर्मचार्यावर नियंत्रण नसल्याने कामाचा ढीग पेडींग अवस्थेत पडला आहे. नागरिक व शेतकर्यांनी अधिकार्यास याबाबत विचारल्यावर अधिकारी संबंधीतांना व्यवस्थित समाधानकारक उत्तर देत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. यापुर्वी असलेले अधिकारी कार्यालयीन वेळेत कामे पुर्ण करीत असल्याने आत्तापर्यंत असा प्रकार कधीच घडला नव्हता. केवळ महिला अधिकारी ह्या निष्क्रिय असल्यामुळे त्यांना कोंडण्याचा प्रकार घडल्याची खमंग चर्चा कार्यालयीन परिसरात ऐकावयास मिळत होती. मंगळवेढा शहरला गफूर तांबोळी व संजय कोंडावडे हे परिक्षण भूमापक असून या दोघांच्या कुचराईमुळे शहरातील कामेही रेंगाळत पडली आहेत. या दोघांची उचलबांगडी करुन तेथे सक्षम कर्मचारी नेमून शहरवासीयांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी सिदराया माळी, युवराज टेकाळे, समाधान हेंबाडे, रोहिदास कांबळे, बापुसो घोडके, राम मेटकरी, सचिन सरवदे उपस्थित होते. या संदर्भात भूमी अभिलेख कार्यालयाच्या प्रमुखाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद असल्यामुळे अधिकचा तपशील मिळू शकला नाही.
मंगळवेढा येथील भूमी अभिलेख कार्यालयाला नागरिकांनी संतापून कुलूप ठोकल्याचे छायाचित्रात दिसत आहे.

























