सोलापूर : गेल्या अनेक वर्षांपासून राजस्थानी समाज भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मात्र अपवाद वगळता आजवर भाजपाकडून राजस्थानी समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजपाने राजस्थानी समाजाला योग्य प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी राजस्थानी समाजाच्या बैठकीत करण्यात आली.
तुळजापूर वेस येथील माहेश्वरी सांस्कृतिक भवनमध्ये राजस्थानी समाजाची संयुक्त बैठक झाली. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक रंगनाथजी बंग, महेश तापडिया, पापाशेठ दायमा, सचिन लड्डा, नितीन करवा, कैलाश कोठारी, श्याम खंडेलवाल, श्यामसुंदर खंडेलवाल, बालाप्रसादजी ओझा, श्यामजी भुतडा, प्रवीण भुतडा, भाऊ पारिख, ओमजी दरक, कैलाशजी कोठारी, श्यामजी बिहानी प्रसिद्ध विविध संघटनांचे अध्यक्ष उपस्थित होते.
राजस्थानी समाजातील अनुभवी व युवा कार्यकर्ते अनेक वर्षांपासून राजकीय पक्षासोबत समाजकार्य करीत आहेत. उद्योग, व्यापार व कारखानदारी क्षेत्रात प्रमुख भूमिका बजावणारा हा राजस्थानी समाजाची सोलापूरच्या अनेक प्रभागांमध्ये निर्णायक मतदारसंख्या आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत राजस्थानी समाजाला महापालिकेत प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजे, अशी मागणी समाजातील जेष्ठांनी केली. अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या राजस्थानी समाजाला यंदा न्याय मिळाला पाहिजे अशी आक्रमक भूमिका समाजातील धुरीणांनी प्रसंगी घेतली. राजस्थानी समाजाला उमेदवारी दिल्यास समाज एकजुटीने उमेदवारांच्या पाठीशी उभे राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

























