सोलापूर – सोळा वर्षाखालील मुलांच्या वन डे क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात लातूरच्या रोहन क्रिकेट अकॅडमीचा दणदणीत पराभव करत येथील मॉडेल क्रिकेट अकॅडमीने आपटे चषकावर आपले नाव कोरले.
येथील दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर 50 षटकांच्या वन डे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात मॉडेल क्रिकेट अकॅडमीसह आठ संघांनी सहभाग नोंदवला होता. या संपूर्ण स्पर्धेत मॉडेल क्रिकेट अकॅडमीने कर्णधार झैद शेख याच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट आणि सांघिक कामगिरी करत भंडारी स्पोर्टस् क्लब, युनायटेड क्रिकेट अकॅडमी, रोहन क्रिकेट अकॅडमी, साऊथ सोलापूर क्रिकेट अकॅडमी यांचा पराभव करुन अंतिम फेरीत शानदार प्रवेश केला.
अंतिम सामना हा लातूरच्या रोहन क्रिकेट अकॅडमी बरोबर झाला. यात प्रथम फलंदाजी करताना रोहन क्रिकेट अकॅडमीने 40 षटकात 8 बाद 153 धावा केल्या. मॉडेल कडून कर्णधार झैद शेख याने 8 षटकांत 28 धावांत 2, आदित्य जाधव याने 5 षटकांत 22 धावात 2, तर प्रतिक्षा नंदर्गीने 6 षटकांत 18 धावा देत 1 बळी मिळवून उत्कृष्ट गोलंदाजी केली.
रोहन क्रिकेट अकॅडमीने दिलेल्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना, मॉडेल क्रिकेट अकॅडमीने 36. 3 षटकांत 6 बाद 157 धावा केल्या आणि 4 गडी राखून दणदणीत विजय प्राप्त करुन, आपटे चषकावर आपले नाव कोरले. मॉडेल कडून ययाती देवकते 51, आदिराज रणसिंग 38 आणि श्लोक आनंद यांनी 29 धावा करुन उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करुन या विजयात आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले.
कर्णधार झैद शेख हा सामनावीर ठरला. या विजयात संघातील अर्जुन दिड्डी (यष्टीरक्षक), हर्ष राऊत, आयुषा भोसले, संस्कार गवळी, राधेश्याम मेरगू, शौर्य जाधव, निमिष कालेल यांनी ही लक्षवेधी कामगिरी करत आपला मोलाचा वाटा उचलला.
या नेत्रदीपक विजयाबद्दल मॉडेल ॲकॅडमीचे प्रमुख मार्गदर्शक माजी रणजीपटू तथा महाराष्ट्र राज्य रणजी निवड समिती सदस्य रोहित जाधव, महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघाचे माजी खेळाडू तथा कोचिंग बियॉंड लेव्हल वन कोच सत्यजीत जाधव, युनिव्हर्सिटीचे माजी खेळाडू अक्षय हावळे तसेच सहाय्यक प्रशिक्षक गौरव वडे यांनी संघातील सर्व खेळाडुंचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.


























