पंढरपूर – येथील चंद्रभागा नदीचे पावित्र्य अबाधित रहावे यासाठी चंद्रभागा नदीच्या प्रदूषणा संदर्भात दाखल असलेल्या उच्च न्यायालयातील याचिकांच्या सुनावणीच्या वेळी न्यायलयाकडून शासनाला तसेच प्रशासनाला काही कडक निर्देश देण्यात आलेले आहेत. न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निर्देशांची शासनस्तरावर किंवा येथील प्रशासनाकडून तंतोतंत अंमलबजावणी होणे अपेक्षीत असताना इथे मात्र प्रशासनाकडून न्यायालयाच्या निर्णयाला अक्षरश: केराची टोपली दाखविली जात आहे. त्यामुळे चंद्रभागेचे प्रदूषण रोखण्या ऐवजी वाढत चालल्याचे दिसत आहे.
पंढरपूर हे राज्यातीलच नव्हे तर देशातील एक महत्वाचे प्रमुख तिर्थक्षेत्र आहे. येथे भरणाऱ्या मोठ्या यात्रांच्या वेळी लाखोंच्या संख्येने भाविकांची मांदियाळी येथे असते.
या ठिकाणी पवित्र चंद्रभागा नदी देखील आहे. येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारे भाविक पंढरपूरात आल्या नंतर प्रथम चंद्रभागेच्या स्नानाला पसंती देतात. चंद्रभागेच्या स्नानानंतरच विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिराकडे जात असतात. इतके येथील चंद्रभागा नदीचे महत्व आहे.
त्यामुळे याच चंद्रभागा नदीच्या प्रदूषणा संदर्भात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने चंद्रभागेचे पावित्र अबाधित रहावे यासाठी प्रशासनाला काही निर्देश दिलेले आहेत. न्यायालयाकडून काही निर्बेंध देखील घालण्यात आलेले आहेत. जेणे करुन न्यायालयाच्या निर्देशांची येथील प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी करुन चंद्रभागेचे पावित्र्य जपणे अपेक्षीत आहे. मात्र इथे प्रशासनाकडून केवळ चंद्रभागेच्या विविध घाटांवर न्यायालयाच्या निर्देशांची केवळ फलकावर माहिती छापण्या पलिकडे प्रत्यक्ष निर्देशाच्या अंमलबजावणीच्या नावाने चांगभले दिसून येते आहे.
कारण इथे पाहिले तर चंद्रभागा नदी मध्ये दररोज जनावरे तसेच वाहने धुतली जातात. सर्रास वाळू उपसा सुरु असल्याचे दिसून येते. पात्रात अनेक अतिक्रमणे दिसून येतात. चंद्रभागा नदीत निर्माल्य तसेच इतर साहित्य फेकलेले दिसून येते. वाळवंटात अनेक घाटांवर झोपड्या तसेच काही ठिकाणी अतिक्रमण करुन पक्की बांधकामे देखील केल्याचे आढळून येते.
मात्र इथले प्रशासन धिम्म आहे. न्यायालयाच्या निर्देशांची कुठेही काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नसल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन प्रशासनाकडून होणार नसेल तर माते समान मानल्या जाणाऱ्या पवित्र चंद्रभागेचे प्रदूषण कोण रोखणार ? असा गंभीर सवाल सुज्ञ पंढरपूरकर नागरिकांकडूनच उपस्थित केला जात आहे.
—————————–
असे आहेत न्यायालयाचे काही निर्देश
चंद्रभागेच्या पात्रातील वाळु उपशावर बंदी घालण्यात आलेली आहे. सा चंद्रभागेच्या पात्रात तसेच वाळवंटात कायम स्वच्छता रहावी, चंद्रभागेच्या पात्रात जनावरे, वाहने धुण्याला मज्जाव करण्यात आलेला आहे. चंद्रभागेच्या पात्रात अतिक्रमणाला देखील बंदी आहे. अंत्यविधी नंतर मृतव्यक्तीची राख, हाडे चंद्रभागेत टाकण्याला देखील मज्जाव करण्यात आलेला आहे. या बरोबरच नदीपात्रात किंवा वाळवंटात कोणत्याही कायमस्वरुपी बांधकामावर देखील न्यायालयाकडून निर्बंध घालण्यात आलेले आहे. मात्र इथे भेट प्रत्यक्ष देवून चंद्रभागेच्या वाळवंटाची पाहणी केल्यास न्यायालयाच्या निर्देशांना अक्षरश: केराची टोपली दाखविण्या पलिकडे येथील प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले दिसत नाही. प्रशासनाच्या या बोटचेप्या भूमिकेमुळेच चंद्रभागेला बकाल अवस्था आलेली आहे.
——————-
एकमेकांवर टोलवा टोलवी पलिकडे काही नाही
येथील चंद्रभागा नदी तसेच वाळवंट वेगवेगळ्या सरकारी विभागांच्या अखत्यारित ( नियमांच्या कचाट्यात ) आडकलेली आहे. कारण चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेची जबाबदारी येथील नगरपालिकेवर ( सध्या काही प्रमाणात मंदिर समितीने घेतलेली ) आहे. चंद्रभागेच्या पात्रातील तसेच वाळवंटातील वाळू संदर्भातील निर्णय हे महसुल प्रशासनाकडून घेतले जातात. या बरोबरच चंद्रभागेच्या पाण्या संदर्भात पाटबंधारे विभागाकडून कार्यवाही केली जाते. त्यामुळे प्रदूषण रोखण्याच्या वेळी प्रत्येक शासकीय विभाग आपआपल्या सोयीनुसार नियम दाखवित बोटचेपे धोरण स्विकारताना दिसुन येते. यासाठी चंद्रभागा नदी संदर्भात एक स्वतंत्र शासकीय मंडळ किंवा विभाग सुरु करुन त्यांनाच सर्व अधिकार देण्यात यावेत असा मतप्रवाह देखील काही सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केला जातो.
————————–
नमामी चंद्रभागेचा पत्ताच नाही
केंद्राच्या नमामी गंगेच्या धर्तीवर राज्य शासनाकडून मध्यंतरी नमामी चंद्रभागा अभियानाची घोषणा करण्यात आलेली होती. त्यासाठी चंद्रभागेच्या उगमा पासून ते राज्यातील शेवटच्या टोका पर्यंत चंद्रभागा निर्मळ, अविरत वाहणारी राहिल यासाठी पाऊले उचलण्यात आलेली होती. त्यासाठी शासनाकडून काही प्रमाणात निधीची देखील घोषणा करुन अनेक ठिकाणी सांडपाणी प्रकल्प देखील राबविले जात असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे जी कामे या प्रकल्पा अंतर्गत सुरु आहेत त्याचा वेग देखील मुंगीच्या गतीने आहे. सांडपाणी प्रकल्पा व्यतरिक्त या अभियनाच्या अन्य काही संकल्पना नुसत्या कागदावरच दिसून येत आहेत.
—————————
फोटोओळी : पंढरपूर : येथील पवित्र चंद्रभागा नदी मध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या घाटांवरुन म्हशी, जनावरे आणून चक्क नदी पात्रात त्यांची स्वच्छता केली जाते. (छायाचित्रे : उमेश टोमके, पंढरपूर )


















