भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्याला साेलापूर लाेकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, असे आव्हान काॅंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नराेटे यांनी दिले. भाजपमध्ये हिंमत आहेच. काॅंग्रेसमध्ये हिंमत असेल तर त्यांनी शिंदे कुटुंबांच्या बाहेरील उमेदवार देऊन दाखावावा, असे प्रत्यूत्तर भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिले. साेलापूर लाेकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी द्यावी असा ठराव नुकताच काॅंग्रेसच्या बैठकीत झाला हाेता. त्यामुळे साेलापुरात आमदार प्रणिती शिंदे याच काॅंग्रेसच्या उमेदवार असतील अशी चर्चा सुरू झाली. यावर भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी बुधवारी टीका केली हाेती. या टिकेला काॅंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नराेटे यांनी जाेरदार उत्तर दिले.
नराेटे म्हणाले हाेते की, भाजपची नाैका लवकरच बुडणार आहे. त्यामुळे ते काॅंग्रेसच्या उमेदवाराला घाबरुन प्रतिक्रिया देत आहेत. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी एका सच्चा कार्यकर्त्याला साेलापुरात उमेदवारी द्यावी. भाजपचे लाेक बाहेरुन उमेदवार आणतात. जातीचे बोगस दाखले काढणाऱ्या लाेकांना उमेदवारी देतात, असे नरोटे म्हणाले होते.