मृत व्यक्तिच्या नावाच्या जागी स्वतचे नांव लावून वारसदाराची फसवणूक केल्याप्रकरणी आप्पासाहेब भोपळे व त्याचा मुलगा अनिल भोपळे (दोघे रा. होटगी रोड ) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. सुनिल पोतदार वय ६५ रा. शुक्रवार पेठ) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुनिल यांचे काका वामन पोतदार व यातील आरोपी आप्पासाहेब भोपळे यांचे वडिल उध्दवराव भोपळे हे दोघे मिळून भागीदारीमध्ये प्लॉट विक्री करित होते. मजरेवाडी, जुळे सोलापूर येथील जुना सर्व्हे नंबर ३०६/१ व नवीन सर्व्हे नंबर १५४/१ व जुना सर्व्हे नंबर ३०७/१ व नवीन सर्व्हे नंबर १५३/१ या दोन गटाचे मुळ मालक उध्दव भोपळे होते. दि. ७ डिसेंबर १९५५ रोजी उध्दव भोपळे यांनी सुनिल पोतदार यांचे काका वामन पोतदार यांना २६ एकर २० गुंठे जागेची विक्री केली होती. त्याचा दस्त क्रमांक १७६४/१९५५ असा आहे.
दि. ५ सप्टेंबर १९९१ मध्ये सुनिल पोतदार यांचे वडील मयत झाले. त्यांचा वारसदार म्हणून सुनिल पोतदार हे होते. दि. २५ मार्च १९९३ मध्ये सुनिल पोतदार यांचे काका मयत झाले. त्यांचे वारसदार म्हणून त्यांची ५ मुले होती. दोन्ही गटाच्या ७/१२ उताऱ्यावर एकूण ६ वारसांची नांवे आहेत. तरी देखील यातील आरोपीं आप्पासाहेब भोपळे व अनिल भोपळे यांनी यातील मयत उध्दव भोपळे यांचे ७/१२ वर नांव लावून ते मयत झाल्याचे पुरावा देवून आरोपी आप्पासाहेब भोपळे वारसदार आहे असे ७/१२ वर नमुद केले.दि. ८ मार्च २०२३ ते आजतागायत वरील दोन्ही आरोपींनी गट नंबर १५४/१ यामध्ये दिवाणी न्यायालय, महसुल न्यायालय व फौजदारी न्यायालय अशा विविध स्वरूपाचे वाद विविध न्यायालयात चालू असताना गटामध्ये प्लॉटिंग पाडलेले असताना जागेतील हितसंबंधीत व्यक्ति मयत झालेली आहे,
हे माहित असतानाही दिवाणी न्यायालयाचा मनाई आदेश असताना स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी सुनिल पोतदार या गटामध्ये हितसंबंधीत आहे अशी व इतर माहिती सादर न करता पोट हिरसा मोजणी करून घेवून, पोट हिस्सा मोजणी नकाशा व आदेशाच्या आधारे स्वतःच्या एकट्याच्या नावाने ७/१२ उतारा तयार करून घेतला. त्या जागेवर अँगल व पत्र्याच्या सहाय्याने कब्जा येवून ती जागा विक्री करण्याच्या उद्देशाने इसारा पावती केली. अशा प्रकारे भोपळे पितापुत्राने सुनिल पोतदार यांची फसवणूक केली. या फिर्यादी वरून दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याचा पुढील तपास फौजदार पोपटभळ हे करित आहेत.