पेटीएमचे शेअर्स २० टक्क्यांनी घसरले आहेत. कंपनीचे समभाग लोअर सर्किटला आले आहेत. पेटीएमने नेमका असा कोणता निर्णय घेतला की त्याचा परिणाम आज शेअर बाजारात कंपनीच्या शेअर्सवर दिसून आला.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली शेअर बाजारातील तेजी आज ठप्प झाली आहे. तीन दिवसांच्या तुफानी वाढीनंतर गुरुवारी शेअर बाजार उघडताच कोसळला. सेन्सेक्स ३०० हून अधिक अंकांनी घसरला आहे. सर्वात मोठा परिणाम आज फिनटेक फर्म वन 97 कम्युनिकेशन लिमिटेड म्हणजेच पेटीएमच्या शेअर्सवर दिसून आला. बाजार उघडताच पेटीएमचे शेअर्स कोसळले. या स्टॉकमध्ये २० टक्क्यांची मोठी घसरण झाली, ज्यासह पेटीएमचे शेअर्स लोअर सर्किटला आले आहेत. ट्रेडिंग दरम्यान, पेटीएम शेअर्स २० टक्क्यांनी घसरले आणि ६५०.६५ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले. तर मागील क्लोजिंग ८१३.३० रुपये होता.
का घसरले पेटीएमचे शेअर्स?
२० ऑक्टोबरला पेटीएमचे शेअर्स ५२ आठवड्यांच्या सर्वात उच्चांकी ९९८.३० रुपयांवर पोहोचले. Paytm च्या शेअर्समध्ये आलेल्या या मोठ्या घसरणीमागे कंपनीचा एक निर्णय कारण ठरत आहे. पेटीएमने आपले छोटे पोस्टपेड लोन कमी करण्याची घोषणा केली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कठोर निर्णयानंतर पेटीएमने हा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयाचा परिणाम आज कंपनीच्या शेअर्सवर दिसून आला. RBI ने वैयक्तिक कर्जाच्या नियमांबाबत कठोरपणा दाखवला आहे. RBI च्या सूचनेनंतर कंपनीने ५० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीची वैयक्तिक कर्ज देण्याची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला. पण या कंपनीचा व्यवसाय हा मुख्यतः छोट्या साईजच्या पोस्टपेड लोनसंबंधित आहे.
ब्रोकरेजला कंपनीचा हा निर्णय आवडला नाही आणि आज घसरणीच्या शेअर्समधून हे स्पष्टपणे दिसून आले. पेटीएमच्या या निर्णयानंतर पोस्टपेड कर्ज निम्म्यावर येऊ शकते, असे मानले जात आहे. छोट्या आकाराची कर्जे कमी होण्याची शक्यता आहे ज्यामुळे कंपनीच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो आणि कंपनीचे नुकसानही होऊ शकते. या शक्यतांमुळे आज या शेअर्समध्ये एवढी मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मात्र पेटीएमच्या या निर्णयाचा कंपनीच्या महसूल वाढीवर कमीत कमी परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.