मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपनं विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवराजसिहं चौहान यांनी ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यातीत नसल्याचं म्हटलं आहे.
मध्य प्रदेशात भाजपच्या विजयानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी, ‘मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत यापूर्वी नव्हतो आणि आताही नाही,’ असे मंगळवारी सांगितले. भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत यंदा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. मध्य प्रदेशात विधानसभेच्या २३० पैकी १६३ जागा भाजपने जिंकल्या आहेत, तर काँग्रेसला ६६ आणि भारतीय आदिवासी पार्टीला एक जागा मिळाली आहे.
‘मी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार यापूर्वी नव्हतो आणि आजही नाही. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून भाजप जे काही काम देईल ते समर्पण आणि पूर्ण क्षमतेने मी नेहमी करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत हे माझे भाग्य आहे. मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. उज्ज्वल, समृद्ध आणि शक्तिशाली भारताची उभारणी मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे,’ असेही शिवराजसिंह चौहान म्हणाले.
विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय पक्षनेतृत्वावर
राजस्थानमध्ये विरोधी पक्षनेता निवडण्याचा अधिकार पक्षाच्या हायकमांडला देणारा ठराव काँग्रेसच्या राजस्थान विधिमंडळ पक्षाने मंगळवारी केला. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक काँग्रेस मुख्यालयात झाली. या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते भूपिंदरसिंग हुडा, मुकुल वासनिक आणि मधुसूदन मिस्त्री उपस्थित होते. मावळते मुख्यमंत्री अशोक गेहलोत, राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह दोतासरा, सचिन पायलट यांच्यासह नवनिर्वाचित आमदार या वेळी उपस्थित होते. काँग्रेसला राजस्थानात ६९ जागा मिळाल्या असून, भाजपला ११५ जागा मिळाल्या आहेत.