सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आ.केराम थेट उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या दालनात!
शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करु!*उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा मागणीला सकारात्मक प्रतिसाद
माहूर तालुका प्रतिनिधी
बजरंगसिंह हजारी
दि. ०९ सप्टेंबर
: किनवट व माहूर तालुक्यात दि १ व २ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पैनगंगा नदीसह परिसरातील जवळपास सर्वच नाल्यांना पूर आल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी उभ्या हातातोंडाशी आलेल्या पिकासह खरडून गेल्या,तर अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.ऐण बहरात आलेली खरीप पिके बाधित झाल्याने बळीराजाच्या तोंडातील घास जणू नैसर्गिक आपत्तीने हिसकावून घेतला.परिणामी बळीराजा प्रचंड आर्थिक नुकसानीसोबतच कमालीचा मानसिक विवंचनेत सापडला आहे.या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी या मतदारसंघाचे शेतकऱ्यांविषयी कळवळा असलेले आमदार भीमराव केराम लगेच सरसावले असून,या संदर्भात त्यांनी दि.६ सप्टेंबर रोजी तडकाफडकी थेट मुंबई गाठून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व अतिवृष्टी व महापूर यामुळे झालेली दोन्ही तालुक्यातील नुकसानीची विदारक अवस्था त्यांच्यासमोर मांडून सरसकट शेतकऱ्यांना तातडीने अर्थसाहाय्य देण्याची मागणी केली.तर विशेष म्हणजे या मागणीला देवेंद्र फडणवीस यांनी देखील लगेच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
३१ ऑगस्ट पासून किनवट व माहूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू होता. त्यात दि.१ व २ सप्टेंबर रोजी दोन्ही तालुक्यातील सर्वच महसुली मंडळात अतिवृष्टी झाल्याने हाता तोंडाला आलेल्या उभ्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार किनवट तालुक्यात ५७,७०० हेक्टर
तर माहूर तालुक्यातील १८,९२० हेक्टर शेतीक्षेत्र बाधित होऊन कापूस,सोयाबीन ज्वारी,तूर,मूग,उडीद,मका ही पिके जमीन दोस्त झाली आहेत.अनेक शेतकऱ्यांचे पशुधन मृत पावले आहेत.
शेतशिवारासह अतिवृष्टी मुळे अनेक गाव खेडी पुराच्या पाण्याने वाढली गेली.वादळी वाऱ्याच्या पावसात शेकडो घरांची देखील पडझड झाली.
या भयावह पूर परिस्थितीचा आढावा घेऊन किनवट-माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी २ सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले व दि.६ सप्टेंबर रोजी तातडीने मुंबई गाठून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात भेट घेतली.भेटी दरम्यान आ.केराम यांनी किनवट-माहूर तालुक्यातील नुकसानीची अद्यावत माहितीचे निवेदन सादर करून देवेंद्र फडणवीस यांच्याशी शेतकऱ्यांना तातडीने कशी आर्थिक नुकसान भरपाई देता येईल या विषयी चर्चा केली.
चर्चेदरम्यान त्यांनी किनवट विधानसभा क्षेत्रातील सरसकट शेतकऱ्यांना व पडझड झालेल्या घरांना राज्याच्या आपत्ती विभागाकडून अर्थसहाय्य मंजूर करण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे लोकार्पण जनसंपर्क कार्यालयातून सांगण्यात आले आहे.