मुंबई : क्रीडाविश्वासाठी मोठी आनंदवार्ता समोर आली असून “मुंबई महापौर चषक २०२५–२६” स्पर्धेला अखेर अधिकृत मंजुरी मिळाली आहे. महापौर रितू तावडे यांनी घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून खंडित झालेली क्रीडा परंपरा पुन्हा जोमाने सुरू होणार आहे. याचबरोबर स्पर्धेच्या निधीत ७५ लाखांवरून थेट ५ कोटी रुपयांची भरीव वाढ जाहीर करण्यात आल्याने संपूर्ण क्रीडाक्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महापालिकेत उच्चस्तरीय बैठक
१८ मार्च रोजी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा संघटकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस उपमहापौर संजय घाडी, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर, विविध गटनेते, शिक्षण अधिकारी, ज्येष्ठ पर्यवेक्षक (क्रीडा), लेखा विभागाचे अधिकारी तसेच विविध क्रीडा प्रकारांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रीडाविकासाच्या विविध मुद्द्यांवर सखोल आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली.
मुंबई स्पोर्ट्सच्या मागण्यांना मोठे यश
या बैठकीत मुंबई स्पोर्ट्स तर्फे बाळासाहेब (बाळ) तोरसकर आणि क्षितीज वेदक यांच्यासह क्रीडा कार्यकर्त्यांनी मांडलेल्या ४ प्रमुख मागण्यांपैकी ३ मागण्यांना मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे क्रीडा क्षेत्रात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून हा क्रीडाप्रेमींसाठी मोठा विजय मानला जात आहे.
महत्त्वाच्या ३ मागण्यांची पूर्तता
महापौरांनी मान्य केलेल्या निर्णयांमध्ये –
१) “मुंबई महापौर चषक” स्पर्धा तातडीने पुन्हा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली.
२) आयोजनास झालेल्या विलंबामुळे स्पर्धा पूर्ण करण्यासाठी ३ महिन्यांऐवजी तब्बल ४ महिन्यांचा कालावधी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
३) स्पर्धेच्या आयोजनासाठी असलेला निधी ७५ लाखांवरून थेट ५ कोटी रुपये इतका वाढवण्याची ऐतिहासिक घोषणा करण्यात आली.
क्रीडा क्षेत्रासाठी मोठा दिलासा
गेल्या ५–६ वर्षांपासून स्पर्धा न झाल्यामुळे वाढलेला खर्च आणि कमी झालेल्या संधींमुळे क्रीडाक्षेत्रात निराशा निर्माण झाली होती. मात्र आता वाढीव निधी आणि स्पर्धा पुन्हा सुरू होणार असल्याने खेळाडू, प्रशिक्षक आणि संघटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे महापौर रितू तावडे यांनी स्वतः खो-खो खेळाडू असल्याचे नमूद करत खेळाडूंच्या समस्या समजून घेत हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले, यामुळे क्रीडाविश्वात समाधान व्यक्त होत आहे.
जिल्हा व राज्य स्पर्धांसाठीही अपेक्षा कायम
बैठकीत जिल्हा व राज्य निमंत्रित स्पर्धांसाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी देखील करण्यात आली. ही मागणी सध्या प्रलंबित असली तरी भविष्यात यावर सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा क्रीडा क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईच्या क्रीडाविश्वाला नवी ऊर्जा
महापौर रितू तावडे यांच्या या निर्णयामुळे मुंबईच्या क्रीडाक्षेत्राला नवसंजीवनी मिळणार असून स्थानिक खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. “महापौर चषक” स्पर्धांच्या पुनरागमनामुळे मुंबई पुन्हा एकदा क्रीडाक्षेत्रात आघाडीवर झळकणार, यात शंका नाही.
आभार प्रदर्शन
सभेच्या शेवटी मुंबई स्पोर्ट्स तर्फे बाळासाहेब (बाळ) तोरसकर यांनी महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर, तसेच उपस्थित सर्व अधिकारी, पदाधिकारी आणि क्रीडा प्रतिनिधी यांचे मनःपूर्वक आभार मानले.

























