लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे विनापरवानगी सभा किंवा लाऊडस्पीकर वापरण्यावर बंदी तर आहेच याशिवाय सकाळी सहाच्या पूर्वी प्रचाराचा भोंगा वापराल तर कायदेशीर कारवाई होऊ शकते. भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकाअंतर्गत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी त्यांच्या अधिकारांचा वापर करून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू केले आहे. यात प्रचाराअंतर्गत सकाळी सहाच्या पूर्वी लाऊडस्पीकरचा वापर करता येणार नाही. तसेच रात्री दहा वाजतानंतरही लाऊडस्पीकर वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याचे सर्वच उमेदवारांना पालन करावे लागणार आहे.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार फिरत्या वाहनातून भोंग्याचा वापर होणार नाही याचीही काळजी घ्यावी, असे म्हटले आहे. यात – पूर्वपरवानगीशिवाय ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही.ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापरही ठरविलेल्या आवाज मर्यादबाहेर असता कामा नये, अशीही सक्त सूचना निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. अन्यथा कारवाई करण्याचे प्रावधान आहे.संस्था, पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते यांनी ध्वनिक्षेपक वापरासाठी जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणे अत्यंत आवश्यक करण्यात आले आहे. त्यात स्थळ व वेळेचा उल्लेख हवा.
रात्री दहा ते सकाळी सहा वाजतापर्यंत ध्वनिक्षेपकावर बंदी
■ निवडणूक कालावधीत लाऊडस्पीकरचा वापर सकाळी सहा वाजेपूर्वी आणि रात्री दहा वाजता- नंतर करता येणार नाही, हे आदेश जिल्ह्यासाठी ६ जून २०२४ पर्यंत अंमलात राहणार आहेत. वेळमर्यादा पाळणे सर्वांसाठीच बंधनकारक आहे. नियमाचा उल्लंघन झाल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.