” विठ्ठलराव क्षीरसागर “
ऐंशीच्या दशकात सोलापूरहून पुण्याला गणपती डेकोरेशन आणि मिरवणूक बघण्यासाठी पुण्याला ग्रुप ने जाण्याची सोलापुरात एक फॅशन होती . अश्याच एके वर्षी आम्ही कॉलेजची दहा बारा जणं पुण्याच्या डेकोरेशन बघत फिरत होतो . पुण्यातल्या अप्पा बळवंत चौकातल्या एका गणपतीसमोर लायटिंग आणि त्या पाठीमागे एक ढोलकी , ढोलक आणि तबला अशी एक कॅसेट लावली होती . खणखणीत ढोलकीची थाप म्हणजे काय असतं , हे त्यावेळी मला समजलं . कॅसेट ज्याने लावली होती त्याला जाऊन विचारलं , त्याने सांगितलं ही , ढोलकी सम्राट श्री विठ्ठलराव क्षीरसागर यांची नुकतीच निघालेली ” ताल यात्रा ” नावाची कॅसेट आहे . त्यावेळी विठ्ठलराव क्षीरसागर हे सोलापूरचे आहेत हे पण माहीत नव्हतं . मी लगेच ती कॅसेट विकत घेतली नन्तर सोलापूरला आल्यावर त्यांना भेटलो . त्या काळात अखिल महाराष्ट्रात ती कॅसेट फेमस होती आणि आजही आहे !
1 सप्टेंबर 1943 साली विठ्ठलरावांचा जन्म सोलापूर येथे झाला , वडील बन्सी क्षीरसागर हे सनई वादक होते , त्यामुळे त्यांच्या बरोबर ताशा वाजवताना वडिलांनी त्यांची ही आवड लक्षात घेऊन त्यांना , श्री भीमराव कनकधर यांच्याकडे तबला वादनाचे शिक्षण घेण्यासाठी पाठवले . तबल्याचे शिक्षण चालू असताना अर्थार्जनासाठी त्या काळातील नळदुर्ग येथील गज़ल गायिका , मुमताज बेगम यांच्या बरोबर त्यांनी साथ केली , ती साथ करताना त्यांना काही काळ , इंदोर येथे वास्तव्याला राहावे लागले . त्या काळात त्यांनी उस्ताद ” जहांगीर खां ” साहेबांचे शिष्य , उस्ताद ” धुलजी खां ” यांच्याकडे आपली तालीम सुरू ठेवली . परत सोलापूरला आल्यावर , ते भीमराव कनकधरांचे
” गंडाबंध ” शिष्य झाले . भीमराव दादांचे गुरुबंधू , ” दाऊद खां ” यांचंही मार्गदर्शन त्यांना लाभलं . दादांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते स्टेज वर कायम हसतमुख असतात , आदरातिथ्य , घरी आल्यागेल्याची आपुलकीने चौकशी करणे , इतक्या मोठ्या , नावाजलेल्या माणसात हे सगळे गुण ही त्यांच्या मोठेपणाची साक्ष आहे . कधीही घरी गेलो की पहिला प्रश्न असतो , ” जेवलास का ? लगेच काकूंना ऑर्डर , ए त्याचं जेवायचं बघ ” त्यांच्या घरी काकूंनी कित्येकवेळा रात्री बेरात्री कार्यक्रमांमुळे जाणं व्हायचं , पण त्या माउलीने आम्हाला रात्री स्वैपाक करून जेऊ घातलेलं आहे .
दादा आणि मी साधारण चौऱ्यांशी साली नोकरीला लागलो , ते आकाशवाणी पुण्याला स्टाफ आर्टिस्ट म्हणून जॉईन झाले , त्यावेळी
” विठ्ठलराव ” साथीला असतील तरंच आम्ही रेकॉर्डिंग करतो असं कित्येक मोठ्या गायकांनी सांगितलं होतं . त्या काळात
” लाईट म्युझिक ” ला तबला वादक म्हणून दादा खूप फेमस होते , गज़ल बरोबर तबला वाजवणारं एकमेव प्रख्यात नाव ” विठ्ठल क्षीरसागर ” यांचं होतं . त्यामुळं बऱ्याच गझल गायकांशी आमचा जवळून संपर्क आला . बऱ्याच गज़ल गायकांचे कार्यक्रम त्यांनी सोलापुरात घडवून आणले . पंडित भीमसेन जोशी , वसंतराव देशपांडे , कुमार गंधर्व , लक्ष्मी शंकर , श्रीमती निर्मला देवी , पंडित जसराज , शोभा गुर्टू यांच्या गायना बरोबर त्यांनी समर्थपणे साथ केलेली आहे . पंडित उल्हास बापट , पंडित
सतीश व्यास , एन. राजम , उस्ताद फैय्याज हुसेन खां , उस्ताद उस्मान खां , उस्ताद अब्दुल हलीम जाफर खां , यांच्या सोबतच्या वाद्य संगीताच्या मैफिली पण त्यांनी गाजवलेल्या आहेत . ढोलकी म्हणजे त्यांची खरी ओळख , ढोलकीवर त्यांचा हात पडला की असं वाटायचं , ती ढोलकी आता बोलायला लागणार आहे ! त्यांचा ढोलकीच्या सोलो वादनावर तर अख्खा महाराष्ट्र तेव्हा फिदा होता , त्याच काळात त्यांनी , विठाबाई नारायणगावकर , सुलोचनाबाई चव्हाण , रोशनबाई सातारकर या लावणी साम्राज्ञी बरोबर सुद्धा खूप कार्यक्रम केले होते . सुमारे सव्वाशे मराठी चित्रपटात , तीस कानडी चित्रपटात आणि वीस हिंदी चित्रपटात त्यांनी वाद्य साथ केली आहे . रामचंद्र चितळकर उर्फ सी. रामचंद्र यांच्या ” घरकुल ” या चित्रपटातील ” मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे ” या आशाबाईंनी अजरामर केलेल्या गाण्याला सुद्धा , दादांची साथ तर आहेच , पण हे गाणं चित्रित करताना त्यात सहभागी होण्याचा बहुमान सुद्धा त्यांना मिळाला आहे !
राम कदम यांच्या बरोबर त्यांची सांगीतिक मैत्री होती , रामभाऊंच्या बऱ्याच चित्रपटात दादांनी तबला ढोलकी वाजविली आहे , त्यात अतिशय गाजलेल्या , डॉक्टर श्रीराम लागू आणि संध्या यांच्या ” पिंजरा ” या चित्रपटाचा नामोल्लेख करावाच लागेल .
संगीत दिग्दर्शक वसंत पवार , सी . रामचंद्र , राम कदम , विश्वनाथ मोरे , बाळ पळसुले यांच्या बरोबर त्यांनी बरीच वर्षे चित्रपट सृष्टीत काम केलेले आहे . ” केला इशारा जाता जाता ” ” एक गाव बारा भानगडी ” अशा अनेक चित्रपटासाठी त्यांनी वाजवलं आहे . दादांच्या सांसारिक आयुष्यातही त्यांनी कुणाला काही कमी पडू दिलं नाही , चार मुलींची यथोचित वेळेला चांगल्या घरात लग्न लावून दिली ,अर्थात ह्या सगळ्यात त्यांना काकू ( शकुंतला क्षीरसागर ) यांची समर्थ साथ आहेच , दादां कार्यक्रमानिमित्त दौऱ्यावर असतांना संसाराचा भार काकूंनीच संभाळलाय . घरी आल्यागेल्याची अगदी आपुलकीने चौकशी त्या करतात . रवींद्र क्षीरसागर हे दादांचे चिरंजीव सध्या , एस.एन.डी.टी महाविद्यालयात तबला ह्या विषयाचे प्राध्यापक आहेत , ते ही पुण्यातल्या बऱ्याच कार्यक्रमात आपली कला सादर करत असतात . रवी हा तबला अलंकार आहे शिवाय त्याने संगीतात एम. ए. सुद्धा केलंय . सध्या तबला ह्या विषयातील डॉक्टरेट मिळवण्याचा त्याचा अभ्यास चालू आहे . विठ्ठलरावांच्या तिसऱ्या पिढीत सुद्धा संगीताचे संस्कार पाहायला मिळतात , त्यांचा नातू सुयश सुद्धा आजोबांच्या आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन उत्कृष्ट तबला वाजवतो . पुण्यातल्या ग्रुप मध्ये तो ही वाजवतो .
विठ्ठलराव सध्या कोथरूड ला , रवींद्रच्या सहयोगाने ” सुयश तबला विद्यालय ” चालवत होते . ऐंशी वय असून सुद्धा सकाळी फिरायला जाणे आणि क्लास हा त्यांचा दिनक्रम सुरू होता , आज दिनांक १७ जानेवारी रोजी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झालं , ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती लाभो !
त्यांचे अंत्यसंस्कार उद्या सकाळी १० वाजता , पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत करण्यात येणार आहेत . ओम शांती !