सोलापूर – राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी राजश्री छत्रपती शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व वृद्ध कलाकार मानधन योजना आवश्यक कागदपत्रांच्या आणि जाचक नियम आटींच्या जंत्रीत अडकल्याचे दिसून येत आहे. वृद्ध कलाकारांना दरमहा ५ हजार मानधन देण्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे. तसा शासन निर्णय देखील जारी केला आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी वृद्ध कलाकारांना विविध कागदपत्रांसह प्रशस्त पत्र शिफारस पत्र अशा कागदांचा गोतावळा गोळा करावा लागणार आहे. त्यानंतरच ज्येष्ठांना सन्मानाचा निधी मिळणार आहे. परंतु निधीसाठी ज्येष्ठांना वारंवार शासकीय कार्यालयाच्या चकरा मारून आपले जोडे झिजवावे लागत असल्याचे दिसत आहे. हा निधी प्राप्त करण्यासाठी ज्येष्ठ कलाकारांना आता आपण स्वतः एक निष्णांत कलाकार असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांची लांबलचक यादी तयार होत आहे. या कागदपत्रांची पूर्तता करता करता ज्येष्ठ कलाकारांची पूर्ती दमछाक होताना दिसत आहे. त्यामुळे यायोजनेचा लाभ मिळण्यासाठी क्लिष्ट आणि जाचक नियम व अटी शिथिल करण्याची मागणी आता ज्येष्ठ कलाकारांमधून केली जात आहे.
दरम्यान, ५० वर्षावरील ज्येष्ठ कलाकारांनाच हा निधी मिळणार आहे. परंतु त्यासाठी त्या ज्येष्ठांना आपण गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून आपली कला जोपासत असल्याचा पुरावा शासनाला सादर करावा लागणार आहे. त्यासाठी एखाद्या नोंदणीकृत संस्थेचे शिफारस पत्र तसेच आपण सहभाग घेतलेल्या शासकीय किंवा खाजगी कार्यक्रमातील प्रशस्तीपत्र, त्या कार्यक्रमाची वृत्तपत्रात आलेली बातमी किंवा फोटो ओळ फोटो यासह रहवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, नोंदणीकृत संस्थेच्या शिफारस पत्र आणि पंधरा वर्षे पूर्वीचा अधिकृत पुरावा देऊन त्यासह शासकीय बँकेत खाते असणे आवश्यक आहे. अशा विविध कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीच्या माध्यमातून कलाकारांच्या अर्जांवर अंतिम मोहोर उमटवून तो ज्येष्ठ कलाकार निधीस पात्र ठरणार आहे.
मात्र या प्रक्रियेसाठीचा लागणारा कार्यकाळ हा न सांगता येणार आहे. कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी ज्येष्ठ कलाकारांना अर्थात नागरिकांना कधी नव्हे ते शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवावे लागत आहेत. एक कागदपत्र मिळवण्यासाठी वारंवार चकरा मारावा लागत असल्याने, उतारवयात कलाकारांना आपली कला सिद्ध करावे लागत आहे. यासह ग्रामीण भागातील ज्येष्ठ कलाकारांना ऑनलाईन प्रक्रिया समजत नाही. त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत. अशा परिस्थितीत ऑनलाइन अर्ज भरून घेणे तसेच ऑफलाइन अर्ज भरून घेऊन सादर करणे. त्यांना जिकरीची जात आहे. यावर प्रशासनाने एक शिबिर भरून त्यामध्ये ज्येष्ठांचे अर्ज भरून घ्यावेत. अशी मागणी आता केली जात आहे.
दरवर्षी १०० ज्येष्ठ कलाकारांचे अर्ज मागविले जाणार असून, त्यांची छाननी होऊन तो अर्ज पात्र ठरणार आहे. त्यासाठी सन २०२२- २३,२०२३- २४,२०२४- २५ या तीन वर्षाच्या कार्यकाळात सुमारे १३०० ज्येष्ठ कलाकारांनी हा निधी मिळण्यासाठी अर्ज सादर केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये निम्म्याहून अर्ज बाद झाल्याचे सांगण्यात आले. तर उर्वरित अर्जदारांना सदरचा निधी वितरित केला जाणार आहे. परंतु त्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक संपन्न होणार असून, त्या बैठकीत शिफारसीच्या माध्यमातून त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगितले जात आहे.
जाचक अट शिथिल करावी.
शाळा न शिकलेल्या ज्येष्ठ कलाकारांना शाळा सोडल्याचा दाखला मिळणे अवघड आहे. त्यासाठी पर्याय म्हणून आधार कार्ड किंवा मतदाकार्ड याला मान्यता द्यावी. त्याचप्रमाणे पंधरा वर्षाखालचा अधिकृत पुरावा देणे अवघड आहे. त्यासाठी दहा वर्षाखालचा पुरावा देण्यास मुभा द्यावी. अर्ज सादर करण्यासाठी शासनाने केवळ १ जुलै ते ३१ जुलै २०२६ पर्यंत एक महिन्याची मुदत दिली आहे. ही मुदत १ जानेवारी ते ३१ जुलै २०२६ पर्यंत द्यावी. जेणेकरून ज्या कलाकारांनी कागदपत्रांची तजवीज केली नाही. त्या जेष्ठ कलाकारांना त्यासाठी मुबलक वेळ मिळणार आहे. ही मागणी घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत.
– ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भाविक वारकरी मंडळ
ऑनलाइन सोबतच ऑफलाईन अर्ज स्वीकारावेत.
ग्रामीण भागातील ज्येष्ठ कलाकारांना ऑनलाईन अर्ज भरणे जमत नाही. अशा स्थितीत शासनाने ऑफलाईन अर्ज स्वीकारणे देखील सुरू ठेवावे. जेणेकरून शहरी आणि ग्रामीण भागातील प्रत्येक ज्येष्ठ कलाकारांना आपल्या सोयीनुसार अर्ज दाखल करता येतील. त्यासह ज्या ज्येष्ठ कलाकारांकडे रहवासी दाखला नाही, त्यांना पर्यायी कागदपत्र उपलब्ध करून द्यावेत.
– लिंबराज वट्टे, ज्येष्ठ कलाकार बाळे तालुका उत्तर सोलापूर शहर
ज्येष्ठ कलाकारांच्या योजनेतील त्रुटी दूर कराव्यात.
ज्येष्ठ कलाकार मानधन योजनेतील विविध अटी या जाचक आणि पूर्ण न होऊ शकणार आहेत. अशा त्रुटी दूर कराव्यात. कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी ज्येष्ठ कलाकारांना वणवण फिरावे लागत आहे. त्यामुळे जाचक असणाऱ्या अटी शिथिल कराव्यात अशी आमची मागणी आहे.
– बाबुराव शिरसागर, ज्येष्ठ कलाकार भोगाव तालुका उत्तर सोलापूर
ज्येष्ठ कलाकार मानधन योजनेचे अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्र संबंधी चर्चा करताना ज्येष्ठ कलाकार आणि अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यांच्यासह इतर पदाधिकारी..




















