भारतात आढळणाऱ्या पट्टेदार वाघ वाचविण्यासाठी अनेक उपाययोजना करुनही वाघांचे अनैसर्गिक मृत्यू होतच आहेत. २०२३ या वर्षात तब्बल २०३ वाघांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच ५३ वाघांचा वर्षभरात मृत्यू झाला आहे.
भारतात आढळणारा पट्टेदार वाघ वाचविण्यासाठी आणि त्याच्या संवर्धनासाठी काही वर्षांत अनेक प्रयोग आणि उपाययोजना झाल्या. असे असतानाही देशभरात विविध कारणांनी वाघांचे अनैसर्गिक मृत्यू होत आहेत. यंदा भारतात २०३ वाघांचे मृत्यू नोंदविण्यात आले. त्याचवेळी, महाराष्ट्रात ५३ वाघांचे मृत्यू झाल्याची आणि देशात पहिल्यांदाच आपले राज्य या बाबतीत सर्वोच्च स्थानी आल्याची आकडेवारी समोर आली. धक्कादायक म्हणजे, मागील दशकभराच्या काळातील हे सर्वाधिक व्याघ्रमृत्यू असल्याचे निष्पन्न झाले आहे. यांपैकी अनेक मृत्यू अनैसर्गिक आहेत. त्यामुळे, अनेक उपाय करूनही देशभरातील यंत्रणांना वाघांच्या वाढत्या अनैसर्गिक मृत्युसंख्येवर अंकुश लावता आलेला नाही.
-संख्या वाढल्याने झाले का मृत्यू?
वाघांच्या मृत्युंमध्ये वाढ झाली आहे, हे मांडतांनाच वाघांच्या एकंदर संख्येतही वाढ झाल्याचे वास्तव आहे. २०२२च्या व्याघ्रगणनेनुसार देशात एकूण ३,६८२ वाघ आहेत. आधीच्या तुलनेत एकूण ७१५ वाघ देशांच्या विविध जंगलांमध्ये वाढले असल्याचे या गणनेतून स्पष्ट झाले. ही व्याघ्रसंख्या बरीच मोठी आहे आणि व्याघ्रमृत्यूंचा विचार या वाढलेल्या व्याघ्रसंख्येच्या आधारावर करावा लागणार आहे. मात्र, केवळ याच एका कारणामुळे वाघांची मृत्युसंख्या वाढली असे नाही. अलीकडे शिकारींचे वाढलेले प्रमाण आणि त्यातील संघटित गुन्हेगारीचा समावेश हा चिंतेचा विषय आहे.
-का मारले जातात वाघ?
वय झाल्यामुळे किंवा जंगलातील दोन वाघांमधील संघर्षात झालेले मृत्यू नैसर्गिक समजले जातात. याव्यतिरिक्त जेथे जेथे मानवी हस्तक्षेप असेल, अशा व्याघ्रमृत्यूंना अनैसर्गिक म्हटले जाते. यामध्ये, रस्त्यावरील वाहने किंवा रेल्वेची धडक, विद्युतधक्का, शिकार, पाणवठ्यात विष कालवणे, जंगलात फिरताना कठडे नसलेल्या विहिरी किंवा अन्य जलाशयांत पडणे, अशा विविध कारणांमुळे वाघांचे मृत्यू होतात. या सर्व मृत्यूंचा अनैसर्गिक मृत्यूंमध्ये समावेश होतो. मागील पाच वर्षांत व्याघ्रमृत्यूंमध्ये झालेल्या वाढीत या अनैसर्गिक मृत्यूंचा वाटा मोठा आहे. त्यातही, शिकार आणि विद्युतधक्क्याने होणारे मृत्यू या प्रकारांचा सर्वाधिक समावेश आहे. देशातील २०३ मृत्यूंपैकी १४७ हे नैसर्गिक आणि ५५ अनैसर्गिक आहेत.
-संघटित शिकारीचे मूळ काय?
महाराष्ट्रात एकूण ५३ वाघमृत्यू नोंदविण्यात आले. त्यामध्ये, संघटित शिकारी टोळ्यांनी केलेल्या वाघांच्या शिकारींचाही समावेश आहे. जुलैत चंद्रपूर जिल्ह्यात शिकार झालेल्या वाघाची कातडी आसाममध्ये जप्त करण्यात आली होती. त्यानंतर, एक मोठे शिकारी नेटवर्कच उघडकीस आले आणि त्यावर कारवाई झाली. २०१३ नंतर महाराष्ट्रात इतक्या संघटितपणे शिकारी पुन्हा सुरू झाल्याचे या घटनेने सिद्ध केले. या शिकारींमध्ये हरियाणा आणि पंजाब राज्यांमधील बवेरिया या भटक्या आणि शिकारीसाठी कुख्यात असलेल्या शिकाऱ्यांचा समावेश आहे. देशभरात वाघांची शिकार करून देशात आणि देशाबाहेर अवयवांची विक्री करण्याच्या उद्योगात हे शिकारी असतात. याशिवाय, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या कटनी परिसरातील बहेलिया समुदायही संघटित शिकारींसाठी ओळखला जातो. यातूनच अलीकडे वाघांचे मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. या सगळ्याच्या मुळाशी वाघ आणि त्यांच्या अवयवांच्या तस्करीतून येणारा पैसा आहे.
-कसे थांबणार अनैसर्गिक मृत्यू?
देशात सर्वाधिक व्याघ्रमृत्यू महाराष्ट्रात झाले. एकूण ५३पैकी निम्म्याहून अधिक मृत्यू चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील आहेत. दरवेळी सर्वाधिक व्याघ्रमृत्यू होणाऱ्या शेजारच्या मध्य प्रदेशात यंदा ४७ मृत्यू नोंदविले गेले. त्या खालोखाल उत्तराखंडमध्ये २६, तमिळनाडूमध्ये १५ आणि केरळमध्ये १४ वाघांना विविध कारणांनी जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही वर्षांच्या प्रयत्नातून वाघांची संख्या वाढली, याबद्दल आनंद व्यक्त होतो. मात्र, या वाघांना सामावून घेण्यासाठी पुरेसे जंगल आहे का, त्यांच्या भ्रमणाचे मार्ग उपलब्ध आहेत का, मानवी वस्तींवरील होणारे हल्ले, जंगलातील अतिक्रमणे आणि जंगलांची सुरक्षा असे अनेक मुद्दे या वाघांच्या जन्म-मृत्यूच्या चक्राशी जोडले गेले आहेत. त्यांची बदलणारी समीकरणे वाघांच्या आकडेवारीतही बदल करतात. वाघांचे अनैसर्गिक मृत्यू रोखण्यासाठीही या उपाययोजना योग्य प्रकारे होणे, हीच महत्त्वाची बाब आहे.