अरुणाचल प्रदेशातही पुराची स्थिती गंभीर
गुवाहटी, 04 जुलै (हिं.स.) : आसाममध्ये पुराच्या पाण्याने आतापर्यंत 46 जणांचा बळी घेतला आहे. राज्यात बुधवारी पुराच्या पाण्यात बुडून आणखी 8 जणांचा मृत्यू झाला. सोनितपूर जिल्ह्यात 2 तर मोरीगाव, दिब्रुगड, दररंग, गोलाघाट, बिस्वनाथ आणि तिनसुकिया जिल्ह्यात प्रत्येकी एक जण मृत्यूमुखी पडला.
प्रशासनाने पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये 515 मदत शिबिरे आणि वितरण केंद्रे स्थापन केली आहेत, जिथे सुमारे 3.86 लाख लोक आश्रय घेत आहेत. पुराचे पाणी घरात शिरल्यानंतर अनेक पूरग्रस्तांनी सुरक्षित ठिकाणी, उंच ठिकाणी, शाळांच्या इमारती, रस्ते आणि पूल यांचा आसरा घेतला आहे. दरम्यान, आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात 11 प्राणी पुराच्या पाण्यात बुडाले आहेत, तर इतर 65 प्राण्यांना वाचवण्यात यश आले आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एएसडीएम) पुराच्या अहवालानुसार, तिनसुकिया जिल्ह्यात 2 जणांचा मृत्यू झाला तर धेमाजी जिल्ह्यात 2 जुलै रोजी एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
राज्यातील पूरस्थिती मंगळवारी अधिक गंभीर बनली, कारण 29 जिल्ह्यांतील 16.25 लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. पुराच्या पाण्यामुळे 42,476.18 हेक्टर पीक क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. या पुराचा एकूण 2800 गावे बाधित झाली आहेत. नेमाती घाट, तेजपूर, गुवाहाटी आणि धुबरी येथे ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हाच्या वर आहे. याशिवाय राज्यातील इतर नद्याही धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत.
स्थानिक प्रशासन, लष्कर, निमलष्करी दल, एसडीआरएफचे बचाव पथक अनेक ठिकाणी बचाव कार्यात गुंतले असून मंगळवारी विविध पूरग्रस्त भागातून सुमारे 2,900 लोकांना वाचवण्यात आले. मंगळवारी प्रशासनाने पूरग्रस्तांना 10754.98 क्विंटल तांदूळ, 1958.89 क्विंटल डाळ, 554.91 क्विंटल मीठ आणि 23061.44 लिटर मोहरीचे तेल वाटप केले आणि गुरांना चाराही दिला. एएसडीएमए पूर अहवालात म्हटले आहे की 11,20,165 प्राणी देखील पुरामुळे प्रभावित झाले आहेत. पुराच्या पाण्यामुळे 100 रस्ते, 14 पूल आणि 11 तटबंधांचे नुकसान झाले.आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बुधवारी राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. अरुणाचल प्रदेशात ढगफुटीमुळे राज्यात पूर आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, आसाममधील पूर चीन, भूतान आणि अरुणाचल प्रदेशच्या वरच्या भागात अतिवृष्टीमुळे आला आणि हे भौगोलिक कारण आहे आणि ते आमच्या नियंत्रणाबाहेर आहे. त्यांनी मदत शिबिरांमध्ये अन्न आणि वैद्यकीय मदत तसेच खराब झालेले बंधारे आणि रस्त्यांच्या दुरुस्तीचे आश्वासन दिले.
आसाम सोबतच अरुणाचल प्रदेशातही पूरस्थिती गंभीर आहे. प्रमुख नद्या धोक्याच्या चिन्हावरुन वाहत आहेत. अधिका-यांनी सांगितले की 60 हजारांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. अरुणाचल प्रदेशातील नामसाई, लोहित, चांगलांग आणि पूर्व सियांग या 4 जिल्ह्यांना भीषण पूर आला आहे तर इतर जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भूस्खलन झाले आहे.दुसरीकडे, सततच्या पावसामुळे मणिपूरच्या इम्फाल पश्चिम आणि इम्फाल पूर्व जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे, राज्यातील दोन प्रमुख नद्यांचे बंधारे फुटले आहेत.