अमरावती, 4 जुलै (हिं.स.) : वारकऱ्यांचा श्वास असलेल्या पंढरीच्या वारीची महती शब्दातीत आहे. वारी ही बघण्यापेक्षा अनुभवण्याची गोष्ट. पंढरीला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणेच अमरावती सायकल असोसिएशनच्या सदस्यांनी अमरावती-पंढरपूर अशा ६०० किमीच्या सायकल वारीला श्री अंबादेवी व श्री एकवीरा देवीचे दर्शन करून बुधवारी सकाळी सुरुवात केली. यावेळी त्यांनी वाटेवरील सर्वांना पर्यावरण रक्षण आणि आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्त्व पटवून देण्याचा निर्धार केला.
अमरावती सायकल असोसिएशनचे राजीव देशमुख, राजेश धोटे, नरेंद्र भटकर, रामराव उईके, विनोद निशितकर, विजय महल्ले, आनंद वानखडे, सदानंद देशमुख, डॉ. देवेंद्र चौधरी, केशव निकम, ऋषिकेश इंगोले व आशिष बोरकर हे सदस्य बुधवारी सकाळी सहा वाजता निघाले. दररोज १०० किमी व शेवटच्या दिवशी २०० किलोमीटरचा प्रवास करत ते ६ जुलैला पंढरपूर पोहोचणार आहेत. त्यासाठी दररोज आपण ४० ते ५० किलोमीटर सायकल चालविण्याचा सराव केल्याचे त्या सायकलस्वारांनी सांगितले.
सायकल रिंगणात सहभाग
आषाढी वारीनिमित्त महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वारकरी पायी वारी करतात. सोबतच महाराष्ट्रातील अनेक सायकलस्वार देखील पंढरपुरात दाखल होतात. ७ जुलै राेजी महाराष्ट्रातील सायकलस्वाराचे रिंगण ज्या ठिकाणी होते, त्यात आम्ही देखील सहभागी होणार असल्याचे अमरावती सायकल असोसिएशनचे सदस्य आनंद वानखडे यांनी सांगितले. अमरावती-वाशिम-तूळजापूर, पंढरपूर असा ६०० किलोमीटरचा प्रवास आम्ही चार दिवसांत पूर्ण करणार आहोत, असे राजीव देशमुख यांनी सांगितले.